शरीरात वात दोष वाढत असेल तर आयुर्वेदात सांगितलाय हा साधा सरळ उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 17:57 IST2025-04-10T17:54:21+5:302025-04-10T17:57:26+5:30

काळजी घ्यावी : अंगाला दररोज तेलाची मालिश करा

If Vata Dosha is increasing in the body, Ayurveda has given this simple remedy. | शरीरात वात दोष वाढत असेल तर आयुर्वेदात सांगितलाय हा साधा सरळ उपाय

If Vata Dosha is increasing in the body, Ayurveda has given this simple remedy.

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
शरीराची सतत झीज होत असते. हालचाली, विचार करणे, निर्णय घेणे, जागरण करणे, मैथूनकर्म करणे, काळाचा परिणाम म्हणून, वात वाढविणाऱ्या अन्नाचे अतिरिक्त सेवन आदी कारणांमुळे शरीरातील वातदोष वाढू लागतो. आयुर्वेदात कफ दोषासाठी वमन, पित्तदोषासाठी विरेचन आणि वात दोषासाठी बस्ती, असे उपचार आयुर्वेदाने सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे कफविकारांसाठी मध खाणे, पित्त विकारांसाठी तूप व वात विकारांसाठी सर्वांगाला तेल लावणे, या साध्या उपचार करता येत असल्याचे तज्ज्ञानी सांगितले.


वात दोष हा वायू व आकाश या महाभूतापासून बनला आहे. म्हणून, त्याचे निराकारण करण्यासाठी आणि आयुष्य निरोगी, दृढ, बलवान आणि हितकर होण्यासाठी आयुर्वेदाने अंगाला दररोज तेल लावण्यास सांगितलेले आहे. तिळापासून निघते ते तेल, हेच तेल गरम करून संपूर्ण अंगाला शरीरावरील केसांच्या दिशेने लावल्यास म्हातारपण उशिरा येते, शरीर आणि मनाचे श्रम नष्ट होतात, वात दोषाचे शमन होते, दृष्टी बलवान होते, शरीराला पुष्टी येते, त्वचा नितळ व सतेज होते, आतड्यांचे बल वाढते, प्रगाढ निद्रा येऊ लागते. शारीरिक आणि मानसिक आजारांसाठी शरीर व मन सक्षम बनते, अम्लपित्त, वाताचे रोग, त्वचाविकार, केसांच्या तक्रारी, मेंदूच्या तक्रारी, मानसिक विकृती इ. इतर आजारांसाठी औषधी सिद्ध तेल किंवा तूप उत्तम गुण देतात.


वातदोष वाढल्यास या समस्या उद्भवू शकतात
अवयव सुकणे, रूक्ष त्वचा, अवयवांचे विस्फार होणे, हाता-पायाला मुंग्या येणे, संधिवात, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी, फुटल्याप्रमाणे वेदना होणे, मोडल्याप्रमाणे वेदना होणे, कंप सुटणे, कठीणपणा येणे, नख व केस दुभंगणे, स्वभाव क्रूर बनणे, मस्तिष्काचा संकोच होणे, वृक्काचा आकार लहान होणे, अवयव खाली सरकणे आदी आजार उत्पन्न होतात. एकंदरीतच शरीरात रूक्षपणा, शीतपणा, हलकेपणा, खरखरीतपणा, चलत्व याची आतोनात वाढ होऊन दूर्धर वातविकारांचाही यातूनच जन्म होतो.


१५ मिनिटे तेलाची मालिश बहुउपयोगी
निरनिराळ्या आजारांसाठी तेल दररोज अंघोळीपूर्वी, रात्री झोपताना किमान १५ मिनिटे शरीरावरील केसांच्या दिशेने चोळून लावावे. त्वचेवरील भ्राजक पित्त, रसधातू, स्वेदवहन करणाऱ्या पोकळ्या, रोमकूप आणि वातदोष यांच्या साहाय्याने ही औषधी तेल शरीरातील आजार घालवतात. 


विविध आजारासाठी तेल वापरण्याच्या या आहेत पद्धती

  • अम्लपित्त नष्ट होण्यासाठी बेलफळ आणि शतावरीचे तेल, म्हातारपण दूर राहण्यासाठी महाविष्णू तेल लावावे. वृक्काचा आकार बारीक होत असल्यास मासे आणि बेलफळ यांचे तेल किंवा तूप पाठीच्या मणक्यात जिरवावे. दम्येकरी लोकांना अळशी आणि लाखेच तेल छातीला लावण्यासाठी वापरावे.
  • कोरडा खोकला असणाऱ्या लोकांनी ज्येष्ठमधाचे तेल वापरावे. हाड ठिसूळ झालेली असताना पिंड तेल संपूर्ण अंगास लावावे आणि गंध तेल अर्धा-अर्धा चमचा गरम पाण्यासह पोटात घ्यावे, इसब, गजकर्ण इ. त्वचा विकारांना करंज तेल, निंब तेल आणि कडू कवठीचे तेल समभाग एकत्र करून लावावे.
  • मधुमेही रुग्णांना रक्तातील साखर कमी येण्यासाठी प्रमेहमिहिर तेलाचे अभ्यंग द्यावे. निद्रानाश झालेल्या लोकांनी हिमसाखर तैल नखशिखांत लावावे. नाकाचे हाड वाढलेल्या लोकांनी चित्रकादी तेल नाकात घालून नाक आणि गालाला लावावे. संधीवातामुळे सांधे वाकडे झाले असल्यास विशिष्ट शेकांसहीत सिद्धार्थक तेलाचा वापर करावा.
  • हाता-पायाच्या मुंग्या कमी होण्यासाठी पद्मकाही तेल लावावे. गुडघेदुखी आणि कंबर, मानदुखी कमी होण्यासाठी कोट्टमचुक्यादी तेल उपयोगी पडते. आमवात नावाच्या आजारासाठी शक्यतो अंगाला तेल लावू नये क्वचित प्रसंगी महाविषगर्भ तेल या रुग्णांना वापरता येते.


"असा एकही विकार शरीरात नाही की, ज्यासाठी आयुर्वेदाने तेलांचा आणि तुपांचा अंतर्बाह्य वापर केलेला नाही, त्यामुळे तज्ज्ञ वैद्यांकडून आपल्या विकारांसाठी योग्य तेल/तूप निवडून त्याचा वापर उटणे, लावणे आणि शेक देणे यासह केल्यास पोटात घेत असलेल्या कुठल्याही पॅथीच्या औषधांनी कमी वेळात दीर्घकाळ आराम मिळू शकतो."
- डॉ. मिलिंद सज्जनवार, आयुर्वेद तज्ज्ञ वर्धा

Web Title: If Vata Dosha is increasing in the body, Ayurveda has given this simple remedy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.