नोंदणी केलेली नसेल, तर तुमचा विवाह ठरेल बेकायदा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 16:59 IST2024-09-04T16:59:28+5:302024-09-04T16:59:55+5:30
आठ महिन्यांत ३८९ विवाह नोंदणी : नोंदणी करणे आवश्यकच

If not registered, will your marriage be illegal?
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विवाह नोंदणी करून त्याचे प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक आहे. प्रत्येक धर्माच्या नागरिकाला ही नोंदणी अनिवार्य आहे. विवाहाची नोंदणी न केल्यास आपला विवाह बेकायदा ठरवला जातो. त्यामुळे विवाह नोंदणीकडे कल वाढत चालल्याचे स्पष्ट होते.
वर्धा नगरपालिकेत ऑनलाइन नोंदणी करून मागील आठ महिन्यांत ३८९ जोडप्यांनी विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेतल्याची माहिती आहे. लग्नानंतर महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. घरगुती हिंसाचार, पतीच्या मृत्यूनंतर घराबाहेर काढणे, पतीच्या मालमत्तांमधून डावलणे आदी समस्या लक्षात घेऊन महिलांवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी सरकारने विवाह नोंदणी अनिवार्य केली आहे. लग्नानंतर तीन महिन्यांच्या आत विवाह नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. यासाठी वर्धा नगरपालिकेत स्वतंत्र कक्ष कार्यरत असून नोंदणीची संख्या वाढत आहे.
तोपर्यंत विवाह बेकायदाच...
विवाहाची नोंदणी होत नाही, तोपर्यंत तो विवाह कायदेशीर मानला जात नाही. सध्या याबाबत जागरूकता करण्यात आली आहे. महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम १९९८ नुसार वधू व वर हिंदू धर्माचे असतील, तर तो विवाह हिंदू मॅरेज अॅक्ट या कायद्यांतर्गत नोंद होतो. वधू व वर वेगवेगळ्या धर्माचे असतील, तर त्यांचा विवाह स्पेशल मॅरेज अॅक्ट या कायद्यांतर्गत नोंदणी केला जातो.
विवाह नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
• वधू-वराच्या आधारकार्डची सत्यप्रत.
• लग्नाचे निमंत्रण देण्याची पत्रिका.
• लग्नाच्या वेळचा दोघांचा फोटो,
• नवरा-नवरी या दोघांचे वय प्रमाणपत्र.
• पुरोहित, काझी यांचे आधार कार्ड.
• आंतरजातीय विवाह असल्यास शंभर रुपयांच्या बाँडवर हमीपत्र.
• पती-पती घटस्फोटीत असल्यास न्यायालयाचा आदेश.
• विधूर असल्यास पहिल्या पती अथवा पत्नीचा मृत्यू दाखला.
• वधू-वरांचे पासपोर्ट आकाराचे फोटो.
• लग्नाच्या वेळी तीन साक्षीदारांची संपूर्ण माहिती व फोटो.
महिनानिहाय झालेली विवाह नोंदणी
महिना नोंदणी
जानेवारी ४३
फेब्रुवारी ५०
मार्च १३
एप्रिल ०१
मे ६९
जून ४६
जुलै ९८
ऑगस्ट ६९
"विवाहानंतर ९० दिवसांत नोंदणी करणे बंधनकारक आहे. यासाठी विशिष्ट शुल्क आकारले जाते. जोपर्यंत विवाहाची नोंदणी होत नाही, तोपर्यंत तो विवाह बेकायदेशीर ठरवला जातो. सध्या विवाह नोंदणी करण्याकडे जागरूकता दिसून येत आहे."
- अभिजीत मोटघरे, विवाह नोंदणी अधिकारी न.प.