'आपण मुख्यमंत्री असताना इंचभर वन जमीन दिली नव्हती'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 05:58 IST2026-01-13T05:58:05+5:302026-01-13T05:58:05+5:30
गणेश नाईक यांनी 'त्यांचा' टांगा पलटी करावाच...

'आपण मुख्यमंत्री असताना इंचभर वन जमीन दिली नव्हती'
ठाणे : मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्याकरिता शूट अॅट साईटचा आदेश दिला जातो. मग, ठाण्यातील जंगल, उद्योगपतीला देणाऱ्यांना वनमंत्री गणेश नाईक गोळी घालण्याचे आदेश देणार का, असा सवाल उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी ठाण्यातील निवडणूक प्रचारसभेत केला.
उद्धवसेना-मनसे-राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या प्रचार सभेत खा. संजय राऊत यांनी आजच्या सभेचे अध्यक्षपद हे गणेश नाईक यांच्याकडे द्यायला हवे; कारण, त्यांनी भाजप सोबत सत्तेत असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करणार, असे आव्हान दिल्याची आठवण करून दिली. हाच धागा पकडून ठाकरे यांनी नाईक यांना ठाण्यातील वन जमिनीत उद्योगपतीला घुसखोरी करुन देणाऱ्यालाही कठोर शासन करणार का, असा सवाल केला. ठाकरे म्हणाले, ठाण्यातील मला जमिनीसाठी नाईक यांनी जी भूमिका घेतली त्याचे आपण स्वागत करतो. आपणही मुख्यमंत्री असताना एक इंचही वनजमीन कोणालाही दिली नव्हती. नाईक यांनी त्यांचा टांगा पलटी करावाच. पण, त्या टांग्याला घोडे नव्हे खेचरं आहेत, असे ते म्हणाले. मुंबईतील म्हणाल, मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबद्दल ठाकरेंनी चिंता व्यक्त केली.
'आपला दवाखाना'मध्ये आता साड्यांचे दुकान
मुंबईकरांनी मुंबई शिवसेनेकडे दिलं, ठाणे शिवसेनेकडे दिलेलं, गद्दाराकडे दिले नव्हते. हा असा निघेल तुम्हाला माहिती नव्हते, मलाही माहिती नव्हते. तुम्ही फसलात मी देखील फसलो, असे ठाकरे म्हणाले. निवडणूक ठाकरे बंधूंची नाही, आम्ही तुमच्यासाठी आहोत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आपला दवाखाना ही योजना सुरू केली. ठाण्यातील 'आपला दवाखाना'मध्ये साड्यांचे दुकान थाटण्यात आले. आता या साड्या त्यांनाच नेसवा, असेही ते म्हणाले.
'पुन्हा भगवा फडकविण्याची जबाबदारी ठाणेकरांची'
ठाणे शहराने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, असे खा. संजय राऊत यांनी सांगितले. ठाणे महापालिकेवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकाविण्याची जबाबदारी ठाणेकरांवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांनी कितीही सभा घेत असतील, तरी ठाकरे बंधूंना इतक्या सभांची गरज नाही. तसेच फडणवीस यांनी वसईत हिंदीत भाषण केल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.