Ambarnath Municipal Council: अंबरनाथमध्ये अनोखे नाट्य, नगरसेवक भाजपात गेले अन् काँग्रेसही संपली...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:38 IST2026-01-08T09:38:57+5:302026-01-08T09:38:57+5:30
Ambarnath Municipal Council Election: “काँग्रेस का हात, भाजप के साथ” झाल्यामुळे राज्यभर टीका आणि काँग्रेसची आता ‘तेलही गेले... तूपही गेले’ अशी स्थिती

Ambarnath Municipal Council: अंबरनाथमध्ये अनोखे नाट्य, नगरसेवक भाजपात गेले अन् काँग्रेसही संपली...!
Ambarnath Politics: महापालिकेची रणधुमाळी सुरू असतानाच अंबरनाथमध्ये एक अनोखे नाट्य घडले. काँग्रेसचे १२ नगरसेवक भाजप आणि अजित पवार यांच्यासोबत हातमिळवणी करत स्वतंत्र गट म्हणून पुढे आले. “काँग्रेस का हात, भाजप के साथ” झाल्यामुळे राज्यभर काँग्रेसवर टीका होऊ लागली.
काँग्रेसने तातडीने या १२ नगरसेवकांना बडतर्फ केले. नगरसेवकांना जे हवे तेच काँग्रेसने केले. पक्षातून बडतर्फ केल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद कायम राहिले. आता ते कोणासोबतही जायला मोकळे झाले. काँग्रेसचे मात्र ‘तेलही गेले... तूपही गेले’ अशी स्थिती झाली आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांनी लोकसभेच्या वेळी शिंदेसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार केला. त्यामुळे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना निलंबित केले होते.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदीप पाटील यांचे निलंबन रद्द करून अंबरनाथ नगरपरिषदेची जबाबदारी त्यांच्यावर दिली. त्यामुळे नाराज होऊन अंबरनाथचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. कृष्णा रसाळ पक्ष सोडून निघून गेले. निवडून आलेल्या १२ नगरसेवकांमध्ये प्रदीप पाटील यांच्या नात्यागोत्याचे पाच ते सात जण आहेत. आता काँग्रेसच्या कार्यालयात बसायलाही तिथे कोणी नाही. पक्ष कार्यालयाला मुंबईतून एक कुलूप पाठवून द्यायचे म्हटले तर पक्ष कार्यालयदेखील प्रदीप पाटील यांनी स्वतःच्या ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे हे “जरा हटके” काम भारीच म्हणावे लागेल.