उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
By सदानंद नाईक | Updated: December 25, 2025 20:05 IST2025-12-25T20:05:00+5:302025-12-25T20:05:54+5:30
Ulhasnagar Municipal Election: पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला

उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
Ulhasnagar Municipal Election: सदानंद नाईक, उल्हासनगर: उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी भाजपात प्रवेश घेतल्याची संधी साधून शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख अरुण अशान, किरण सोनावणे यांनी शिवसैनिकांसह श्रीरामनगर शिवसेना शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराला उद्धवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने तणाव निर्माण झाला. पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.

उल्हासनगर उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी बुधवारी दुपारी भाजपाच्या मुंबई प्रदेश कार्यालयात समर्थकासह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी भाजपचे आमदार कुमार आयलानी, शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, प्रदीप रामचंदानी, अमर लुंड आदी जण उपस्थित होते. बोडारे यांनी भाजपात प्रवेश केल्याची संधी साधून बुधवारी सायंकाळी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख अरुण अशांन यांनी पक्ष पदाधिकारी व शिवसैनिकासह कॅम्प नं-४ मधील उद्धवसेनेची श्रीरामनगर शिवसेना शाखेचा कब्जा घेतला. यावेळी अतिउत्साही शिवसैनिकांनी शाखेतील उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे फोटो कपड्याने झाकून पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवला.

श्रीरामनगर शाखेवर शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कब्जा घेतल्याची माहिती उद्धवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना समजल्यावर त्यांनी शाखेत धाव घेतली. यावेळी तणाव निर्माण होऊन घोषणाबाजी झाली. वेळीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने, पुढील अनर्थ टळला. शाखेचा प्रश्न दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून सोडविण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माघार घेतल्याने, तणाव मावळला असून शाखा ताब्यात घेण्यावरून भविष्यात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली.