उल्हासनगर महापालिका निवडणूक, भाजप-शिंदेसेनेत राडा; पोलिसांचा लाठीमार आणि 'हाय व्होल्टेज' ड्रामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 19:40 IST2026-01-15T19:38:35+5:302026-01-15T19:40:04+5:30
उल्हासनगर गोलमैदान परिसरातील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाचे संपर्क प्रमुख अरुण तांबे हे पैशाचे वाटप करतात. याची माहिती आमदार कुमार आयलानी यांच्या पत्नी मीना आयलानी तसेच मुलगी यांना मिळाल्यावर त्यांनी थेट खासदार कार्यालयाला धडक दिली.

उल्हासनगर महापालिका निवडणूक, भाजप-शिंदेसेनेत राडा; पोलिसांचा लाठीमार आणि 'हाय व्होल्टेज' ड्रामा
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका निवडणुक मतदाना दरम्यान शहरात ठिकठिकाणी हिंसाचार आणि वादाच्या घटना घडल्या आहेत. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या मतदानाला दुपारी गालबोट लागले. भाजप आणि शिंदेगट कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षाने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अनेक ठिकाणी सौम्य लाठीमार करावा लागळा आहे.
उल्हासनगर गोलमैदान परिसरातील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाचे संपर्क प्रमुख अरुण तांबे हे पैशाचे वाटप करतात. याची माहिती आमदार कुमार आयलानी यांच्या पत्नी मीना आयलानी तसेच मुलगी यांना मिळाल्यावर त्यांनी थेट खासदार कार्यालयाला धडक दिली. कार्यालयातून पैसे वाटप का सुरू आहे? असा सवाल करत त्यांनी जाब विचारला, ज्याचे रूपांतर तू तू मैं मैं व धक्काबुक्कीत झाले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत खासदार कार्यालयाचे प्रमुख अरुण तांबे यांना ताब्यात घेतले. मात्र, ठोस तक्रार नसल्याने प्राथमिक चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. तरीही, या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहे.
शहरातील विविध प्रभागांमध्ये गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. प्रभाग क्रं-१७ येथिल मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यावेळी ओमी कलानी समर्थक नेत्याला या लाठीचा प्रसाद मिळाल्याची चर्चा शहरांत रंगली आहे. तर प्रभाग क्रं- १२ येथील जसलोक शाळेच्या मतदान केंद्राबाहेर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. प्रभाग क्रं-१६ मधील माजी नगरसेविका चैनानी यांच्या पतीला पैसे वाटप केल्याच्या संशयावरून हिललाईन पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा प्रकार उघड झाला. प्रभाग क्रं-१९ व २० मध्येही तणावपूर्वक वातावरण होते. तेथेही पोलिसांना नागरिकांना पांगविण्यासाठी लाठीचा प्रसाद अतिउत्साही नागरिकांना द्यावा लागला. तर आमदार बालाजी किणीकर व महापालिका अधिकारी यांच्या मतदार यादीतील त्रुटीमुळे खडाजंगी झाली.
जीवे मारण्याची धमकी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप
कॅम्प नं-३ मधील प्रभाग क्रं-१२ मध्ये तणाव शिगेला पोहोचला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार अभिजित पालवे यांच्या केंद्र प्रतिनिधीला स्थानिक माजी नगरसेवक सिरवानी यांच्या समर्थकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.