TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 23:54 IST2025-12-29T23:51:20+5:302025-12-29T23:54:46+5:30
Mahayuti TMC News: आगामी महानगरपालिका जागावाटपावर महायुतीचे शिक्कामोर्तब झाले असून शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार आहे.

TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेत महायुतीचे काय होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर सोमवारी रात्री उशिरा झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले असून महायुतीचा अधिकृत फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. ठाण्यातील या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सेनेने आपला वरचष्मा कायम राखला आहे. ठाण्यात शिंदेसेना ८७ आणि भाजप ४० जागांवर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
सोमवारी रात्री ठाण्यातील ऐतिहासिक आनंद आश्रम येथे शिंदे सेना आणि भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक पार पडली. गेल्या काही दिवसांपासून श्रीरंग आणि नौपाडा या दोन प्रभागांच्या जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, या बैठकीत स्थानिक नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने हा वाद आता पूर्णपणे मिटला आहे. बैठकीनंतर दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी माहिती दिली की, जागावाटप निश्चित झाले असून संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी आता अंतिम मंजुरीसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठवण्यात आली आहे. उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने (३० डिसेंबर २०२५) आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळी उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्म मिळण्याची शक्यता आहे.