ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, ११० उमेदवार निवडून येतील: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 06:17 IST2026-01-06T06:17:02+5:302026-01-06T06:17:22+5:30
ठाण्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाण्यात विविध भागातून प्रचार रॅली काढण्यात आली होती.

ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, ११० उमेदवार निवडून येतील: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८७ आणि महायुतीचे ११० उमेदवार निवडून येतील आणि महायुतीचाच भगवा पुन्हा एकदा महापालिकेवर फडकेल, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी व्यक्त केला.
ठाण्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सायंकाळी सात वाजता ठाण्यात विविध भागातून प्रचार रॅली काढण्यात आली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला. यावेळी खा. नरेश म्हस्के, माजी आ. रवींद्र फाटक, आ. संजय केळकर, निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते. जांभळी नाका परिसरातून या रॅलीला सुरुवात झाली.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने विरोधकांचा सुपडा साफ झाला, त्याचपद्धतीने आता महापालिका निवडणुकीतही होईल, असा दावा त्यांनी केला. ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी त्याचा महायुतीवर परिणाम होणार नसल्याचे नमूद केले. ठाणे पालिकेसह इतर पालिकांवरही पुन्हा एकदा भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रॅलीत लाडक्या बहिणी अधिक प्रमाणात सहभागी झाल्याने त्यांचेही यावेळी शिंदे यांनी कौतुक केले.
रॅली राबोघा शंकर रोड, चेंदणी कोळीवाडा, भवानी चौक, टेंभी नाका, चंदनवाडी नाका, सिद्धेश्वर तलाव शाखा, ज्ञानेश्वरनगर शंकर मंदिर चौक, लोकमान्य नगर डेपोजवळ, भीमनगर त्यानंतर मानपाडा आणि मनोरमानगर अशा भागातून गेली. ज्या ज्या ठिकाणांहून ही रॅली गेली, त्या त्याठिकाणी तेथील महायुतीचे उमेदवार सहभागी झाले होते. सांयकाळी गर्दीच्या वेळेस रॅली काढल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती.