अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टात; ६ बिनविरोध उमेदवारांप्रकरणी अहवाल सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 05:38 IST2026-01-08T05:38:36+5:302026-01-08T05:38:36+5:30
या वादग्रस्त अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आता आयोगाच्या कोर्टात गेला आहे.

अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टात; ६ बिनविरोध उमेदवारांप्रकरणी अहवाल सादर
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीत शिंदेसेनेच्या सहा उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद केल्याचा आक्षेप असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील तसेच सत्त्वशीला शिंदे यांच्या संदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल ठामपा आयुक्त व मुख्य निवडणूक अधिकारी सौरव राव यांनी बुधवारी आयोगाला पाठवला. त्यामुळे या वादग्रस्त अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आता आयोगाच्या कोर्टात गेला आहे.
बिनविरोध निवडणूक प्रकरणात सत्ताधाऱ्यांशी संगनमत केल्याच्या आरोपावरून या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेत २४ तासांत कार्यवाही करण्याचा पर्याय देत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता.
मनसे शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट
प्रभाग १८ व ५ मधील निवडणुकीत सत्ताधाऱ्यांशी संगनमत करीत पक्षपाती भूमिका घेऊन बिनविरोध उमेदवार निवडीत मदत केल्याचा आरोप मनसेने पाटील आणि शिंदे या दोन अधिकाऱ्यांवर केला होता. या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तसेच न्यायालयात याचिकाही केली. त्यानंतरही कारवाई न झाल्याने मंगळवारी जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्त राव यांची भेट घेतली. प्रशासनाने बुधवारी बिनविरोध निवडप्रकरणी दोन्ही अधिकाऱ्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल आयोगाकडे पाठवल्याची माहिती दिली.