आनंद आश्रमाचा साधा पत्रा तरी बदलला आहे का?; नरेश म्हस्केंचा राजन विचारेंना सवाल

By अजित मांडके | Published: May 8, 2024 02:37 PM2024-05-08T14:37:20+5:302024-05-08T14:38:15+5:30

शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली ठाण्याच्या विविध भागातून सुरु होती. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

Thane Lok Sabha Election - Mahayuti Alliance candidate Naresh Mhaske criticism of Rajan Vichare | आनंद आश्रमाचा साधा पत्रा तरी बदलला आहे का?; नरेश म्हस्केंचा राजन विचारेंना सवाल

आनंद आश्रमाचा साधा पत्रा तरी बदलला आहे का?; नरेश म्हस्केंचा राजन विचारेंना सवाल

ठाणे :  राजन विचारे यांनी आतापर्यंत आनंद आश्रमातला एक पत्रा तरी बदलला आहे का ? त्यांच्याकडे टिका करण्यापलिकडे आता काही शिल्लक राहिलेले नाही. त्यांना टिका करुद्या आम्ही आमचे काम करत राहू असे मत शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. आनंद आश्रमात दिघे यांचा आदर राखण्यासाठी आम्ही धडपड केली आहे. संस्कृती परंपरा टिकविण्याचे काम आम्ही केले असल्याचेही ते म्हणाले. ही प्रचाराची रॅली नसून ही विजयाची रॅली असल्याचे ते म्हणाले.

शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली ठाण्याच्या विविध भागातून सुरु होती. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले. गद्दारी राजन विचारे यांनी बाळासाहेबांच्या विचारांची केली आहे. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत. एक महिन्यापासून काम करतात मात्र एक पत्रक लोकांपर्यंत पोहचले नाही. त्यामुळे काँग्रेसकडे पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन जाणार होते आणि ते गद्दार आहेत असे बोलणे साफ चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

राज घराण्यातील एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीने राजकारणात उतरवणे हेच मुळात चूक आहे, शाहु महाराजांचा पराभव त्यांनी स्विकारला असल्यानेच राऊतांकडून असे आरोप केले जात आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या आयोध्याच्या मुद्यावरुन म्हस्के यांना छडले असता, अयोध्यामध्ये मी स्वत: एकनाथ शिंदे आणि संजय राऊत एकत्र बसलो होतो यावेळी संजय राऊत यांनी बंडाचा विषय काढत मी तुमच्या पूर्णपणे पाठीमागे आहे असे सांगितले होते असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. दरम्यान म्हस्के यांची प्रचार रॅली  मीनाताई ठाकरे चौक, कॅसलमील नाका, आदर्शनगर, कोलबाड रोड, उथळसर, दादापाटील वाडी, टेकडी बंगला, चंदनवाडी शाखा आदी भागातून फिरली. त्यानंतर  धर्मवीर आनंद दिघे यांचे शक्तीस्थळ, खारटन रोड, भंडार आळी, गोखले रोड, राम मारुती रोड, गावदेवी मार्केट अशा भागातून गेली.

भाजपचा घरोघरी प्रचार
ठाणे शहरातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा घरा-घरांमध्ये प्रचार सुरू केला आहे. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले कार्य, महायुतीने घेतलेले विविध निर्णय आदींची माहिती मतदारांपर्यंत देऊन पुन्हा पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा मोदींची निवड करण्यासाठी आवाहन केले जात आहे, अशी माहिती भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली. नरेश म्हस्केंना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, असा प्रचार केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

Web Title: Thane Lok Sabha Election - Mahayuti Alliance candidate Naresh Mhaske criticism of Rajan Vichare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.