मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहिम; मतदानाबाबत आयुक्त सौरभ राव यांनी केले नागरिकांना आवाहन
By अजित मांडके | Updated: April 13, 2024 13:51 IST2024-04-13T13:49:48+5:302024-04-13T13:51:13+5:30
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी संपूर्ण शहरात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहिम; मतदानाबाबत आयुक्त सौरभ राव यांनी केले नागरिकांना आवाहन
अजित मांडके, ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी संपूर्ण शहरात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या किसननगर शाळा क्र. २३ मध्ये मी मतदानाचा हक्क बजावणार असा फलक लावण्यात आला असून त्यादवारे स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येत आहे. आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी देखील या फलकावर स्वाक्षरी करुन या मोहिमेत सहभाग घेतला तसेच उपस्थितांना मतदान करण्याचा संदेश दिला.
या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, तसेच महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांनीही स्वाक्षरी करुन आपला सहभाग नोंदविला. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सभागत वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदार जागृती व्हावी यासाठी ठामपा शाळा क्र. २३ मध्ये स्वाक्षरी मोहिम फलक लावण्यात आला असून शाळेत येणारे शिक्षक, पालक मतदानाचा हक्क बजावणार असल्याबाबत फलकावर स्वाक्षरी करीत आहे. आज महापालिका आयुक्त यांनी देखील या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होवून मतदान करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले.