भाजपला हरवत शिंदेसेनेचा उपनगराध्यक्ष; कायदेशीर लढाया सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 06:14 IST2026-01-13T06:14:24+5:302026-01-13T06:14:47+5:30
अंबरनाथच्या उपनगराध्यक्षपदी सदाशिव पाटील, राष्ट्रवादीच्या (अजित पवार) मदतीने मारली बाजी

भाजपला हरवत शिंदेसेनेचा उपनगराध्यक्ष; कायदेशीर लढाया सुरू होणार
अंबरनाथ : एकमेकांना दंड थोपटून दाखवत प्रचंड राडेबाजी झाली. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप व शिंदेसेनेच्या विरोधात दंड थोपटून उभे असलेल्या अजित पवार यांच्याच मदतीने शिंदेसेनेने स्वतःच्या पक्षाचा उपनगराध्यक्ष अंबरनाथमध्ये बसवला. सोमवारी झालेल्या चुरशीच्या आणि अटीतटीच्या निवडणुकीत शिंदेसेनेने भाजपवर बाजी मारली. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) चे उमेदवार सदाशिव पाटील यांनी भाजप व अंबरनाथ विकास आघाडीचे उमेदवार प्रदीप पाटील यांचा पराभव केला.
हेच पाटील आणि १२ नगरसेवक काँग्रेसमधून निवडून आले. नंतर त्यांनी वेगळा गट करत भाजपसोबत हातमिळवणी केली होती. त्यांना काँग्रेसने बडतर्फ केल्यावर भाजपने त्यांना लगेच आपल्या पक्षात प्रवेशही दिला. मात्र एवढे करूनही उपनगराध्यक्षपद काही भाजपला मिळाले नाही. मात्र यावरून कायदेशीर लढाया सुरू होणार आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरू असताना राष्ट्रवादी (अजित पवार) चे चार नगरसेवक शिंदेसेनेसोबत गेले. त्यांना विकास आघाडीचा व्हीप लागू असल्याचा दावा भाजपने केल्याने सभागृहात वादावादी झाली. त्यातच निवडणूक प्रक्रिया पार पडली.
भाजपचे प्रदीप पाटील यांना २८ मते मिळाली तर शिंदेसेना-राष्ट्रवादी (अजित पवार) च्या युतीचे उमेदवार सदाशिव पाटील यांना ३२ मते मिळाली. विजयी सदाशिव पाटील यांचा सत्कार करण्यासाठी स्वतः खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर उपस्थित होते.
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांच्या दोन बैठकांत दोन ठराव; जिल्हाधिकारी सापडले दोन सत्ताधाऱ्यांच्या कात्रीत
नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नगरसेवकांनी भाजपवर मात करत आपला उपनगराध्यक्ष बसवल्यानंतर भाजपच्या नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी पाच स्वीकृत सदस्यांपैकी तीन पदे भाजपच्या, तर दोन पदे शिंदेसेनेच्या वाट्याला गेल्याचे जाहीर केले.
राष्ट्रवादी (अजित पवार) च्या चार सदस्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी ७ जानेवारी रोजी मान्यता दिलेल्या अंबरनाथ विकास आघाडीकडे ३२ सदस्यांचे बहुमत असल्याचा निर्वाळा करंजुले यांनी दिला. मात्र, नगराध्यक्षांनी बैठक तहकूब केल्यानंतर शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) ने उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभागृह भरवून दुसरा ठराव संमत करत शिंदेसेनेच्या वाट्याला तीन, तर भाजपच्या पारड्यात दोन स्वीकृत सदस्य टाकण्याचा ठराव मंजूर केला. हे दोन्ही ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी गेल्यास कायदेशीर पेच निर्माण होणार आहे.
भाजप-शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
अंबरनाथ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक शिंदेसेना आणि भाजप यांनी प्रतिष्ठेची केल्याने सोमवारी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडे झाले. पालिका कार्यालयात घोषणायुद्ध रंगले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला डिवचले, त्यावरून काही काळ तणाव निर्माण झाला. चुकीचे हावभाव करणाऱ्या शिंदेसेनेच्या सैनिकांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला
जिल्हाधिकाऱ्यांकडे एक गटाने नोंदणी केल्यानंतर त्या गटातील पक्ष किंवा सदस्य दुसरा गटात परस्पर जाऊ शकत नाही. याचा दाखला देत भाजपने शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) च्या संख्याबळावर आक्षेप नोंदवला. शिंदेसेनेने आपला गट अधिकृत असून, त्याचे संख्याबळ जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदणीकृत केल्याचे स्पष्ट करत त्याच संख्याबळावर निवडणुकीची मागणी केली.
स्वीकृत सदस्यांची निवड करताना नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी ७ जानेवारी रोजीच्या पत्राचा आधार घेत अंबरनाथ विकास आघाडीला तीन नगरसेवकपदे बहाल करून त्यांची नावे घोषित केली. उर्वरित दोन सदस्यपदे शिंदेसेनेच्या वाट्याला गेल्याचे जाहीर केले. करंजुले यांनी हा निर्णय जाहीर केल्यावर लागलीच राष्ट्रगीताने सभा संपल्याचे जाहीर केले. भाजप नगरसेवकांनी सभागृहाबाहेर येत जल्लोष केला.
राष्ट्रवादी (अजित पवार) चे चार नगरसेवक शिंदेसेनेसोबत असल्याने बहुमताचा ३२ हा जादुई आकडा शिंदेसेनेसोबत असूनही एक कमी स्वीकृत नगरसेवकपद पदरात पडल्याने चिडलेल्या शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर न येता उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांना पीठासीन अधिकारी बनवत सभागृहात नवीन ठराव मंजूर करून शिंदेसेनेला तीन, तर भाजपला दोन स्वीकृत नगरसेवकपदे दिली.
भाजप-शिंदेसेना हे दोन्ही सत्ताधारी पक्ष आहेत. भाजपकडे मुख्यमंत्रिपद आहे, तर एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कात्रीत सापडणार आहेत.