Municipal Election: भाजपाकडून मतदारांना पैशांचे वाटप? शिंदेसेनेचा आरोप, मनसेच्या नेत्याने व्हिडीओ दाखवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:11 IST2026-01-12T15:08:32+5:302026-01-12T15:11:40+5:30
सर्वाधिक जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे चर्चेत असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत आता पैसे वाटप केल्याचा प्रकार समोर आला आहे. मनसेच्या नेत्याने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Municipal Election: भाजपाकडून मतदारांना पैशांचे वाटप? शिंदेसेनेचा आरोप, मनसेच्या नेत्याने व्हिडीओ दाखवला
कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपा आणि शिंदेसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आधीच २१ जागांवर बिनविरोध निवडणूक झाली असून, आता १५ जानेवारी रोजी उर्वरित जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच शिंदेसेनेच्या उमेदवारांने भाजपाकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आऱोप केला. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी भाजपाकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, भाजपाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे.
डोंबिवली पूर्व मध्ये प्रभाग क्रमांक २९ मधून शिंदेसेना आणि भाजपाच्या उमेदवारांमध्ये लढत होत आहे. शिंदेसेनेचे नितीन पाटील या प्रभागातून निवडणूक लढवत असून, त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप केला.
शिंदेसेनेच्या उमेदवाराने काय केला आरोप?
नितीन पाटील म्हणाले की, गेल्या महिनाभरापासून मी भाजपाची पोलखोल केली आहे. त्यामुळे माझ्या पराभवासाठी भाजपा नको ते धंदे करत आहे. कार्यालय असलेल्या दशरथ भवनमध्ये भाजपाचे कार्यकर्ते पैसे वाटत होते, असा आरोप त्यांनी केला.
भाजपाकडून प्रत्येक मतदाराला तीन हजार रुपयांचे पाकीट देण्यात आले. भाजपाचे विष्णू पेंडणेकर बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांचे कार्यकर्ते पाकिटे वाटत आहेत, असाही आरोप पाटील यांनी केला. पण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
राजू पाटलांनी पैसे वाटल्याचा व्हिडीओ केला शेअर
मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी भाजपाकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. राजू पाटील म्हणाले, "डोंबिवलीत प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजपाचे गांधी प्रेम! सर्रास पैसे वाटप सुरू आहे. कालचा रेट ३००० रुपये होता, हे प्रकरण उघडकीस आल्यावर रेट ५००० रुपये प्रति मत केल्याचे ऐकायला येत आहे. डोंबिवलीत पैसा व गुंडगिरीचा वापर सुरूच आहे. सत्तेचा माज ओसांडून वाहत आहे", असे राजू पाटील यांनी व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे.
डोंबिवलीत प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजपाचे गांधी प्रेम …….!
सर्रास पैसे वाटप सुरू आहे. कालचा रेट ३०००/- होता, हे प्रकरण उघडकीस आल्यावर रेट ५०००/- प्रति मत केल्याचे ऐकायला येत आहे. डोंबिवलीत पैसा व गुंडगीरीचा वापर सुरूच आहे.सत्तेचा माज ओसाढून वाहत आहे. pic.twitter.com/fRCkLZnLxZ— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) January 12, 2026
भाजपाने आरोप फेटाळले
भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब म्हणाले, "भाजपाचे कार्यकर्ते प्रचारपत्रके वाटप करत होते. त्यावेळी स्थानिक शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना पकडण्यात आले. प्रचारपत्रकांमध्ये बळजबरी पैसे कोंबले आणि नंतर भाजपा कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याची बोंब केली. भाजपावर करण्यात आलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत."