शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 22:33 IST2026-01-10T22:33:32+5:302026-01-10T22:33:59+5:30
या फेसबुक पोस्टवर भाजपा उमेदवार दिनेश जैन यांच्या पत्नी सुनीता जैन यांनी प्रतिक्रिया दिली

शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
मीरारोड - मीरारोडमध्ये भाजपा आणि शिंदेसेना वेगवेगळी लढत आहे. याठिकाणी भाजपा उमेदवाराबद्दल नाराजी व्यक्त करत एका जैन व्यापाऱ्याच्या मुलाने शिंदेसेनेला मतदान करण्याचं आवाहन करणारी फेसबुक पोस्ट लिहिली. त्यावरून भाजपा उमेदवाराच्या पत्नीने त्याला धमकी दिल्याचा आरोप आहे. याबाबत नया नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
मीरारोडच्या शांतीनगर भागातील प्रभाग २० मध्ये भाजपाने माजी नगरसेवक दिनेश जैन यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. दिनेश जैन यांना उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ येथील इच्छुक व्यापारी संघटनेचे प्रकाश जैनसह अनेक दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली होती. लोकांनी भाजपा कार्यालयाकडे धाव घेऊन दिनेश यांच्या उमेदवारीस विरोध केला होता. शिवाय अन्य इच्छुकही नाराज झाले.
शांतीनगर मधील रुपम ज्वेलर्सचे मालक व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी तथा तेरापंथ जैन समाजचे अध्यक्ष रामणिक राजू शाह हे त्याच प्रभागात पूनम नगर फेस ३ मध्ये राहतात. त्यांचा २६ वर्षीय तरुण मुलगा निल शाह यांनी समाज माध्यमांवर आपली भूमिका मांडली. त्यात शाह यांनी आम्हाला देवेंद्रजी आणि मेहताजी यांच्या बद्दल प्रॉब्लेम नसून आम्हाला प्रॉब्लेम आहे तो भाजपाच्या स्थानिक उमेदवाराबद्दल. ज्यांना हा भाजपाचा उमेदवार आवडत नसेल तर शिवसेनेला मत द्या. मुंबई आणि महाराष्ट्रात तर महायुती आहे म्हणून तुमचे मत देवेंद्रजी पर्यंत पोहचेल असे लिहले होते.
या फेसबुक पोस्टवर भाजपा उमेदवार दिनेश जैन यांच्या पत्नी सुनीता जैन यांनी प्रतिक्रिया दिली. तू खूप लहान असून लहान बनून रहा. तुझ्या घराच्या टेरेसकडे लक्ष दे जे अनधिकृत आहे. त्याचे काय करायचे ते आता ते मला सांग असं म्हणून निल शाह यांना अनधिकृत बांधकाम तोडण्याबाबत धमकावले. या घटनेने येथील व्यापारी आणि मतदार संतप्त झाले आहेत. सदर प्रकार शिंदेसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना व्यापाऱ्यांनी कळवल्यानंतर त्यांनी अशी गुंडगिरी सहन करणार नाही. अशा प्रकारच्या धमक्यांनी घाबरू नका, एकही मतदार नागरिकांच्या घराला हात लावू देणार नाही असे आश्वस्त केले. त्यानंतर निल शाह यांनी नया नगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार सुनीता जैन विरुद्ध दिली आहे. आपल्या व कुटुंबियांना धोका असून तक्रारीची नोंद घ्यावी. आम्हाला त्रास होणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी अशी मागणी निल शाह यांनी केली आहे.