घरी शौचालय असल्याचे प्रमाणपत्र द्या; नंतरच उमेदवारी दाखल करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:55 IST2025-12-31T12:55:40+5:302025-12-31T12:55:40+5:30
स्वयंघोषणा पत्र देणे पुरेसे तरी अर्ज भरताना बहुतांश उमेदवारांनी घेतली काळजी

घरी शौचालय असल्याचे प्रमाणपत्र द्या; नंतरच उमेदवारी दाखल करा
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड : महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना कोणताही धोका नको म्हणून उमेदवार हे खूप काळजी घेत असतात. शिवाय अर्ज रद्द होण्याची भीती असते. त्यामुळेच उमेदवारी अर्जात थकबाकी, ठेकेदार आदींबाबत नमूद असताना तसेच घरात शौचालय आहे त्याबद्दल स्वयंघोषणापत्र देणे पुरेसे असताना सर्व प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र घेण्यासाठी उमेदवार घाई गडबड करतात.
जवळपास ७-८ वर्षांनी महापालिका निवडणुका होत असल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सर्वच पक्षात उमेदवारी अर्ज मिळवण्यासाठी इच्छुकांची गर्दी दिसून आली. महापालिका निवडणुकीसाठी आयोगाने जारी केलेल्या नामनिर्देशनपत्रात तशी वेगळी प्रमाणपत्रे, ना-हरकत घेण्याची आवश्यकता नसते. तरी देखील इच्छुक हे कराची थकबाकी, ठेकेदार नाही आदी विविध बाबतींत अर्ज करून ना-हरकत दाखले वा प्रमाणपत्र घेत असतात. ७-८ वर्षानी मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे इच्छुकांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.
जुळवाजुळव करताना उमेदवारांच्या नाकीनऊ
तसे शहरातील बहुतांश उमेदवार हे इमारतीमध्ये वा स्वतंत्र घरात राहतात. त्यांच्याकडे शौचालय घरातच आहेत. तर झोपडपट्टी भागात राहणाऱ्या उमेदवाराची अडचण होऊ शकते. मात्र, हल्ली झोपडपट्टीत देखील एकमजली वा मोठी - घरे असून त्यात देखील शौचालय आत असते. मात्र, स्वयंघोषणापत्र देण्यावर फक्त विश्वास न ठेवता बहुतांश उमेदवार हे महापालिकेकडून शौचालयाबाबत प्रमाणपत्र घेऊन धोका पत्करत नाहीत.
'सार्वजनिक'चाही उल्लेख चालणार
घरात शौचालय नसेल तर सार्वजनिक शौचालयाचा उल्लेखदेखील अर्जात चालतो. तसे स्वयंघोषणापत्र देता येते. प्रमाणपत्रच घ्यायचे असेल तर आरोग्य -विभागाकडे अर्ज केल्यावर कमर्चारी येऊन सार्वजनिक शौचालय ठिकाणी - उमेदवाराचा फोटो काढून तास अहवाल देतो.
शौचालयाचेही प्रमाणपत्र आवश्यक ?
घरात शौचालय आहे, याच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसते. तुम्हाला अर्जासोबत स्वयंघोषणापत्र द्यावे लागते. सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असतील तर प्रमाणपत्र घेणे अपेक्षित आहे. तरी देखील सरसकट इच्छुक उमेदवार हे शौचालयाचे प्रमाणपत्र घेत असतात.
आरोग्य विभाग घरी येऊन तपासणी करणार
इच्छुक उमेदवाराने घरी शौचालय असल्याचे प्रमाणपत्रासाठी आरोग्य विभागाला अर्ज केल्यावर विभागाचा कर्मचारी घरी येऊन शौचालयासह इच्छुक उमेदवाराचे छायाचित्र काढून तसा अहवाल देतो. त्या अहवालाच्या आधारे उमेदवारास तसे प्रमाणपत्र दिले जाते.
...तर अर्ज बाद किंवा अपात्रतेची शक्यता
घरात शौचालय असल्याचे किंवा सार्वजनिक शौचालय वापरत असल्याचे स्वयंघोषणा पत्र दिले नसेल तर उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. घरात शौचालय नसताना ते घरात आहे असे खोटे घोषणापत्र वा पत्र दिल्यास देखील अर्ज बाद होऊ शकतो.
प्रमाणपत्रांसाठी पालिकेची काय तयारी?
प्रमाणपत्र देण्यासाठी महापालिकेने एक खिडकी योजना सुरू केली होती. त्या ठिकाणी कोणत्याही थकबाकी, प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यावर संबंधित विभागातून त्याची पूर्तता करून प्रमाणपत्रे, दाखले हे त्याच एक खिडकी योजनेच्या ठिकाणी इच्छुकांना उपलब्ध करून देण्यात आले.
महापालिकेने इच्छुक उमेदवार व उमेदवारांच्या सुविधेसाठी एक खिडकी योजना सुरू केल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र, थकबाकी नसल्याचे दाखले, शौचालय असल्याचे प्रमाणपत्र तसेच परवानग्या हे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध केलेले आहे. त्यामुळे उमेदवारांची सोय झाली असून त्यांना अन्यत्र धावपळ करण्याची गरज नाही. - योगेश गुणिजन, सहायक आयुक्त, मीरा-भाईंदर पालिका