प्रचार साहित्यावर नाव अन् संख्या नसेल तर उमेदवारांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 08:54 IST2026-01-01T08:53:47+5:302026-01-01T08:54:58+5:30
उमेदवारी बाद होणे किंवा निवडून आल्यावरही पद रद्द होण्याची आयोगाकडून कार्यवाई होणार

प्रचार साहित्यावर नाव अन् संख्या नसेल तर उमेदवारांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड : निवडणुकीत राजकारणी आणि उमेदवार हे सर्रास पूर्वपडताळणी व परवानगी न घेता प्रचाराचे साहित्य छापून त्याचे मतदारांमध्ये वाटप करतात. त्यावर प्रति, प्रत क्रमांक, मुद्रक आणि प्रकाशक आदींचा उल्लेख टाळून बेकायदा प्रचार साहित्य वाटतात. काही जण संख्या कमी दाखवून फसवणूक करत असतात. या प्रकरणी कारवाई करण्याच्या तरतुदी असल्या, तरी महापालिका, पोलिस, निवडणूक निर्णय अधिकारी, कठोर कारवाई होत नाही. तक्रारी आचारसंहिता पथके आदींकडून स्वतःहून करूनही कारवाईस टाळाटाळ केली जाते.
निवडणूक प्रचार साहित्यामध्ये प्रचाराची पत्रके, हस्तपत्रके, पोस्टर-बॅनर फ्लेक्स, भित्तीपत्रके, कार्य अहवाल, मतदार स्लिप, जाहीरनामा आदी सर्व छापील जाहिराती आणि मजकुरांचा समावेश होतो. निवडणुकीच्या प्रत्येक प्रचार साहित्यावर प्रतींची संख्या, प्रत क्रमांक, ज्या प्रेसमध्ये छपाई केली आहे, त्या मुद्रणालयाचे नाव व पत्ता, ज्यांनी प्रकाशित केले, त्यांचे नाव व पत्ता छापणे बंधनकारक आहे.
नियमांचे उल्लंघन करून छापलेल्या प्रचार साहित्याचा खर्च हा हिशोबात नमूद करण्यापासून आचारसंहिता भंगासह विविध कायदे नियमानुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई होऊ शकते. उमेदवारी बाद होणे किंवा निवडून आल्यावर पद रद्द होण्याची कार्यवाहीही होऊ शकते. निवडणूक प्रचाराचे साहित्य छापताना त्यावर प्रतींची संख्या, प्रत क्रमांक, ज्या प्रेसमध्ये छपाई केली आहे, त्या मुद्रणालयाचे नाव व पत्ता, ज्यांनी प्रकाशित केले, त्यांचे नाव व पत्ता न छापल्यास. दंडात्मक कारवाई होऊ शकते. प्रिंटिंग प्रेस मालकावरसुद्धा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार कोणत्याही धर्म, जात, भाषा, लिंग, पेहराव आर्दीच्या आधारे मते मागणे, तसेच अशा आधारे तेढ-तिरस्कार पसरवणारा प्रचार करणे गुन्हा आहे. प्रार्थना स्थळाचे प्रदर्शन अशा प्रकरणात गुन्हा दाखल केला जातो.
पत्रकाची प्रत कार्यालयाकडे सादर करणे अनिवार्य
प्रचार साहित्यासाठी छपाई मजकुराचे संबंधित समितीकडून पूर्वप्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकास्तरीय समितीकडे अर्ज करावा लागेल, तसेच छपाई केलेली प्रत ही माहितीसाठी संबंधित निवडणूक कार्यालयाकडे सादर करायला हवी. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार ही परिसरातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास, आचारसंहितेबाबत नेमलेल्या भरारी पथकास, महापालिका व पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी, तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे करता येते.
प्रचार साहित्याबाबत कोणतेही उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी परिसरातील निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तेथील आचारसंहिता पथक आदींकडे तत्काळ तक्रार करावी. त्यामुळे संबंधित अधिकारी हे त्याची पडताळणी करून योग्य ती कारवाई करतील. - डॉ. संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका निवडणूक