अर्ज भरण्यासह छाननीसाठीही रात्र; ना आकडेवारी मिळाली, ना शपथपत्र, अनेक कामांना विलंब
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:12 IST2026-01-02T11:12:16+5:302026-01-02T11:12:16+5:30
मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक प्रशासनाचा सावळा गोंधळ

अर्ज भरण्यासह छाननीसाठीही रात्र; ना आकडेवारी मिळाली, ना शपथपत्र, अनेक कामांना विलंब
धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड : मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती, तशीच स्थिती बुधवारी अर्ज छाननीच्या दिवशीही पाहायला मिळाली. मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच सर्व सोयी-सुविधा असतानादेखील निवडणूक प्रशासनाचा सावळा गोंधळ दिसून आला.
शपथपत्र संकेतस्थळावर अपलोड करण्यापासून ते दाखल अर्जाची आकडेवारी, वैध-अवैध अर्जाची संख्या, एकूण उमेदवारांची संख्या छाननीच्या दुसऱ्या दिवशी रात्री जाहीर केली. २४ प्रभागांतून ९५ नगरसेवकांसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी महापालिकेने ७ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये थाटलेली आहेत. प्रत्येकी कार्यालयात ३ ते ४ प्रभागाचे कामकाज होत आहे. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यास मोठी गर्दी झाली होती. जेणेकरून त्यादिवशी मध्यरात्रीचे १ ते २ वाजले. तर ३१ डिसेंबर रोजी छाननीच्या दिवशीही संपूर्ण कामकाजाला रात्री उशीर झाला. हे दोन दिवस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी तणावाचे व धकाधकीचे होते, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने दिली.
आकडेमोडीत चुका
प्रभागनिहाय उमेदवारी अर्ज व उमेदवारांची यादी बनवताना नियमानुसार आद्याक्षरप्रमाणे तयार केली पाहिजे होती. मात्र, सुरुवातीला उमेदवारी अर्ज आले, त्या क्रमाने केल्याने त्या याद्या पुन्हा आद्याक्षरप्रमाणे बनवाव्या लागल्या. आरओ कार्यालयात अर्जावरून आकडेवारी चुकल्याने पुन्हा आकडेमोड करावी लागली.
अधिकृत माहिती देण्यास उजाडला दुसरा दिवस
मंगळवारी आलेल्या अर्जाची आकडेवारी आणि माहिती अधिकृतपणे जाहीर होण्यास दुसऱ्या दिवशी बुधवारी उशीर झाला, तर छाननीनंतर वैध आणि अवैध अर्ज तसेच उमेदवारांची संख्या याची माहितीदेखील महापालिकेकडून दुसऱ्या दिवशी गुरुवारी रात्रीपर्यंत मिळाली नव्हती. शपथपत्रदेखील नागरिकांना सहज उपलब्ध करून दिले गेले नव्हते. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून जशी अंतिम माहिती येत होती त्यानुसार आकडेवारी सादर केली गेली. शपथपत्र स्कॅन झाले असून शुक्रवारी संकेतस्थळावर अपलोड होतील, असे पालिकेचे उपायुक्त डॉ. सचिन बांगर यांनी सांगितले.