मिरा-भाईंदरमध्ये खरी लढत भाजपा-शिंदेसेनेत? छुप्या युतीद्वारे पाडापाडीच्या खटाटोपांचे आरोप
By धीरज परब | Updated: January 5, 2026 10:04 IST2026-01-05T10:04:31+5:302026-01-05T10:04:31+5:30
२४ प्रभागांतून ९५ जागांसाठी निवडणूक होत आहे.

मिरा-भाईंदरमध्ये खरी लढत भाजपा-शिंदेसेनेत? छुप्या युतीद्वारे पाडापाडीच्या खटाटोपांचे आरोप
धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मिरारोड : मुख्य चुरस भाजप व शिंदेसेनेत होण्याची शक्यता असली तरी काँग्रेसलाही काही प्रभाग राखण्यासाठी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही फिस्कटली असून केवळ उद्धवसेना आणि मनसे हेच एकत्र लढत आहेत. मात्र, एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी छुप्या युतींचे आरोप केले जात आहेत.
२४ प्रभागांतून ९५ जागांसाठी निवडणूक होत आहे. स्थानिक नेतृत्वामुळे येथे महायुती होऊ शकली नाही. त्यामुळे भाजपने ८७, तर शिंदेसेनेने ८१ उमेदवार उभे केले आहेत. पाठोपाठ उद्धवसेनेने ५६, तर मनसेने ११; काँग्रेसने बविआला एका जागी सोबत घेत ३२ जागी उमेदवार उभे केले आहेत. तर राष्ट्रवादी (अजित पवार)ने ३३, तर राष्ट्रवादी (शरद पवार)ने १४ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. वंचित, एमआयएमने ठराविक जागी उमेदवार दिले आहेत. ल राजस्थानी, गुजराती, उत्तर भारतीय मतदारांचे प्राबल्य पाहता भाजपला हे हक्काचे मतदार वाटत असल्याने त्यांना यश मिळेल, अशी खात्री आहे.
कोण काय म्हणाले?
भाजप आमदार नरेंद्र मेहता हे वारंवार भाजपचा जनाधार असून शिंदेसेनेमुळे आम्हाला काहीच फायदा नाही, अशी भूमिका मांडत आहेत. तर गेल्या काही वर्षात विकासकामांच्या आणि सर्व जाती - प्रांतवासीयांना एकत्र आणण्याच्या बळावर पालिकेत सत्ता येण्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक करत आहेत.
भाजपत सर्वाधिक बंडखोरी
भाजपने अनेक माजी नगरसेवकांसह इच्छुक पदाधिकाऱ्यांची तिकिटे कापल्याने या पक्षाच्या विद्यमान आमदारांवर रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे भाजपतून सर्वाधिक बंडखोर झाली. शिंदेसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी भाजपने उद्धवसेना, एमआयएम, वंचित यांना बळ दिले गेल्याचे आरोप होत आहेत. उद्धवसेनेची ताकद कमी असतानाही त्यांनी अवास्तव जागा मागितल्याचा आरोप मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार) व काँग्रेसने केला. मराठी मते विभागण्याची भाजपची खेळी असल्याचा आरोप शिंदेसेनेचा आहे. तर काँग्रेसचा प्रभाव असलेल्या भागात एमआयएम, वंचित बहुजन आघाडी व उद्धवसेनेने उमेदवार उभे केले असून त्यांना रसद देण्याचे काम भाजपने केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. तसेच शिंदेसेना व काँग्रेसने छुपी युती केल्याचा आरोप भाजप आ. मेहता यांनीदेखील केला आहे.