लोकसभा निवडणूक: १५ हजारांहून अधिक पोलिसांची ठाणे, भिवंडी, कल्याणवर नजर!

By जितेंद्र कालेकर | Published: May 16, 2024 09:28 PM2024-05-16T21:28:42+5:302024-05-16T21:31:25+5:30

राज्य राखीव दलासह केंद्रीय औद्योगिक दलाच्याही तुकड्या तैनात

Lok Sabha Elections: More than 15 thousand police watch over Thane, Bhiwandi, Kalyan! | लोकसभा निवडणूक: १५ हजारांहून अधिक पोलिसांची ठाणे, भिवंडी, कल्याणवर नजर!

लोकसभा निवडणूक: १५ हजारांहून अधिक पोलिसांची ठाणे, भिवंडी, कल्याणवर नजर!

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राज्य राखीव पोलिस दलासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांमध्ये १५ हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात सध्या पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, सात पोलिस उपायुक्त यांच्यासह आठ हजार पोलिसांचे संख्याबळ आहे. त्याशिवाय, आता तिन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये बाहेरील जिल्ह्यांमधून अतिरिक्त तीन पोलिस उपायुक्त नऊ सहायक पोलिस आयुक्त आणि १९ निरीक्षक, तसेच नाशिक प्रशिक्षण केंद्रातील ८० प्रशिक्षण उपनिरीक्षक, पिंपरी- चिंचवडमधील ६९० अंमलदार, तीन हजार ४९१ होमगार्ड असा सात हजारांहून अधिकचा फौजफाटा आहे.

केंद्रीय सुरक्षा दलासह राखीव पोलिसांच्या कंपन्या तैनात

ठाणे शहर परिमंडळ एकमध्ये सातारा, पुणे शहरामधून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) तीन कंपन्या तर राज्य राखीव दलाची एक कंपनी तैनात केली आहे. परिमंडळ दोन भिवंडीमध्येही सीआयएसएफच्या पुणे आणि धाराशिवच्या चार कंपन्या आहेत. तर, परिमंडळ तीन कल्याणमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या रत्नागिरी आणि धाराशिवच्या दोन, कर्नाटकची एक आणि पुणे ग्रामीण एक अशा पाच कंपन्या आहेत. तर, उल्हासनगर परिमंडळामध्ये सिुंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे ग्रामीणच्या चार एसआरपीएफ तसेच बीएसएफच्या कंपन्या राहणार राहणार आहेत. तर, वागळे इस्टेट परिमंडळ पाचमध्ये कोल्हापूर आणि पुणे ग्रामीणच्या रेल्वे सुरक्षा दल, बीएसएफ आणि राज्य राखीव दल अशा तीन कंपन्या नेमल्या आहेत. याशिवाय, ठाणे, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या चार परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक, तर भिवंडीमध्ये दोन अशा सहा एसआरपीएफच्या प्लाटून आहेत. यामध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांच्याही चार हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी यांची भर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा संपूर्ण फौजफाटा मतदान केंद्र आणि इव्हीएम मशिन असलेल्या स्ट्रॉगरूमच्या ठिकाणी राहणार आहे.

एका कंपनीत १२० कर्मचारी

ठाणे जिल्ह्यात राज्य राखीव दलासह केंद्रीय राखीव पाेलिसांच्या २५ कंपन्या राहणार आहेत. यातील एका कंपनीत १२० कर्मचारी असल्यामुळे सुमारे तीन हजारांहून अधिकचा हा फाैजफाटा यात राहणार आहे.

Web Title: Lok Sabha Elections: More than 15 thousand police watch over Thane, Bhiwandi, Kalyan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.