भिवंडीत भाजप कार्यकर्त्यांकडून कोणार्क विकास आघाडीच्या समर्थकांना मारहाण...
By नितीन पंडित | Updated: January 15, 2026 14:27 IST2026-01-15T14:24:58+5:302026-01-15T14:27:50+5:30
भिवंडी शहरात मनपा निवडणुकीदरम्यान, प्रभाग क्रमांक एक येथे भाजपा आमदार महेश चौघुले आणि कोणार्क आघाडीचे उमेदवार माजी महापौर विलास पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन चौघुले कार्यकर्त्यांनी कोणार्क विकास आघाडी समर्थकांना मारहाण केली आहे.

भिवंडीत भाजप कार्यकर्त्यांकडून कोणार्क विकास आघाडीच्या समर्थकांना मारहाण...
भिवंडी - शहरात मनपा निवडणुकीसाठी मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली असून काही ठिकाणी शांततेत तर काही ठिकाणी तणावपूर्ण वातावरणात मतदान सुरु आहे. प्रभाग क्रमांक एक येथे भाजपा आमदार महेश चौघुले आणि कोणार्क आघाडीचे उमेदवार माजी महापौर विलास पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन चौघुले कार्यकर्त्यांनी कोणार्क विकास आघाडी समर्थकांना मारहाण केली आहे. सकाळपासूनच या दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची सुरु झाली होती तर सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान चॅलेंज ग्राऊंड परिसरात कोणार्कच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केली.तर कोंबडपाडा येथील साईनाथ मंदिर परिसरात देखील कोणार्कच्या एका कार्यकर्त्यास भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे.
प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजप पुत्र मित महेश चौघुले हे माजी महापौर पुत्र मयुरेश विलास पाटील यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उभे राहिल्यापासून या प्रभागात हाणामारी व मारहानीच्या घटना मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत.
प्रभाग क्रमांक १९ मधील मतदान केंद्र २२ ते २६ या ठिकाणी काँग्रेस व समाजवादीचे कार्यकर्ते आपसात भिडले होते.त्यामुळे याठिकाणी काही काळ गोंधळ उडाला होता.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना केंद्रा बाहेर पळवून लावल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली.त्यांनतर या केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. प्रभाग दोन येथे दुपारी एक वाजेच्या सुमारास समाजवादी व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती.