"त्यांच्या दारात जायलाही तयार"; नजीब मुल्लांचे जितेंद्र आव्हाडांसोबत जाण्याचे संकेत, पुण्याचा पॅटर्न ठाण्यात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 17:40 IST2025-12-25T17:33:43+5:302025-12-25T17:40:26+5:30
जितेंद्र आव्हाडांसोबतच्या युतीवर नजीब मुल्लांची 'ओपन ऑफर'

"त्यांच्या दारात जायलाही तयार"; नजीब मुल्लांचे जितेंद्र आव्हाडांसोबत जाण्याचे संकेत, पुण्याचा पॅटर्न ठाण्यात?
Thane Municipal Corporation: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगाने आणि धक्कादायक घडामोडी घडत आहेत. पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात असतानाच, आता त्याचे पडसाद ठाण्यातही उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कट्टर राजकीय विरोधक झालेले आमदार जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जितेंद्र आव्हाड आमचे शत्रू नसल्याचे नजीब मुल्ला यांनी म्हटलं आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार जागावाटपाबाबतची पहिली संयुक्त बैठक गुरुवारी रात्री पार पडली. विशेष म्हणजे, ही चर्चा केवळ दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यावर झाली आहे. पुण्याचा हा पॅटर्न आता संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.
ठाण्यातही मनोमिलनाचे संकेत
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी मोठे विधान केले आहे. मुंब्रा-कळवा विधानसभा निवडणुकीत आव्हाडांच्या विरोधात दंड थोपटणारे मुल्ला म्हणाले की, "जितेंद्र आव्हाड हे आमचे दुश्मन नाहीत. जर आम्हाला दोन्ही गट एकत्र येण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव आला, तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवू आणि त्यावर सकारात्मक विचार करू."
"जितेंद्र आव्हाड आमचे शत्रू नाहीत. ३० तारखेपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढण्याचा प्रस्ताव आला तर त्याचे आम्ही स्वागत करु. कारण कार्यकर्त्याला निवडून आणणं महत्त्वाचे आहे. प्रश्न आमच्या अहंकाराचा किंवा मी पणाचा नाही. कार्यकर्ता निवडून येण्यासाठी त्यांच्या सोबत किंवा त्यांच्या दारात जरी जायला लागले तरीही आम्ही तयार आहोत," असं नजीब मुल्ला म्हणाले.
राजकीय समीकरणांची जुळवाजुळव
नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड हे एकेकाळी अत्यंत जवळचे सहकारी होते, मात्र पक्ष फुटीनंतर ते एकमेकांचे कट्टर विरोधक बनले होते. आता मुल्लांच्या या विधानामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध रान पेटवणारे दोन्ही गट आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि इतर पक्षांना रोखण्यासाठी एकत्र येण्याची चिन्हे आहेत.
महायुती आणि मविआचे काय होणार?
जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे एकत्र लढल्या, तर याचा मोठा फटका भाजप आणि शिवसेना (दोन्ही गट) यांना बसू शकतो. पुण्यात झालेल्या पहिल्या संयुक्त बैठकीनंतर आता ठाणे आणि इतर जिल्ह्यांतही अशाच प्रकारच्या बैठकांचे सत्र सुरू होण्याची शक्यता आहे.