लाेकसभा निवडणुकीत ‘खुला फेसबुक, निकला उम्मीदवार’

By संदीप प्रधान | Published: April 8, 2024 09:36 AM2024-04-08T09:36:59+5:302024-04-08T09:37:21+5:30

किमान २५ वर्षांपूर्वीची गोष्ट... एका छोट्याशा गावात राज्यातील एका बड्या राजकीय नेत्याची प्रचारसभा सुरू होती

In the memmories of Lok Sabha Elections, 'Open Facebook, see Candidate' | लाेकसभा निवडणुकीत ‘खुला फेसबुक, निकला उम्मीदवार’

लाेकसभा निवडणुकीत ‘खुला फेसबुक, निकला उम्मीदवार’

किमान २५ वर्षांपूर्वीची गोष्ट... एका छोट्याशा गावात राज्यातील एका बड्या राजकीय नेत्याची प्रचारसभा सुरू होती. गावात वीजपुरवठा करण्याचे आश्वासन नेत्याने पाच वर्षांत पूर्ण न केल्याने विरोधकांनी प्रचारात टीका सुरू केली होती. सभा सुरू असताना एक ट्रक येऊन सभेच्या ठिकाणी थांबला. त्यातून विजेचे पोल खाली उतरवले गेले. उमेदवार म्हणाला, वचनपूर्ती, आश्वासनपूर्ती म्हणतात ती हीच. बघा आज विजेचे खांब आले. मतदानानंतर घराघरांत वीज येणार, ही काळ्या दगडावरील पांढरी रेष. लोकांनी टाळ्या पिटल्या. मतदान भरघोस झाले. तो नेता विजयी झाल्याचा गुलाल उधळला गेला. पुन्हा ट्रक आला आणि सर्व विजेचे पोल भरून निघून गेला. गाव अंधारातच राहिले. 

त्यावेळची निवडणूक साधी होती आणि मतदार भोळे होते? उमेदवारांना प्रसिद्धीकरिता इमेज बिल्डिंगकरिता एक-दोन नव्हे तर चांगली पाच-सहा लोकांची टीम तैनात करावी लागते. वास्तववादी जगातील निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्याकरिता व्हर्च्युअल वर्ल्डमधील आपले मतदार शोधून त्यांच्या मन व मेंदूचा ताबा घेणे ही गरज झाली आहे. त्यामुळेच ‘फटा पोस्टर निकला हिरो’ या धर्तीवर आता येणाऱ्या काळात ‘खुला फेसबुक निकला उम्मीदवार’ हाच अनुभव वारंवार येणार आहे.

देशात स्मार्ट फोन व सोशल मीडियाचा उदय होण्यापूर्वी म्हणजे १९९५ नंतर काही मातब्बर नेत्यांनी इमेज बिल्डिंगकरिता काही मंडळी नियुक्त केली होती. मुख्यमंत्री, मंत्री यांच्या दिमतीला सरकारचा माहिती व जनसंपर्क विभाग असतो. परंतु त्या पलीकडे जाऊन नेत्यांनी ही मंडळी नियुक्त केली. ज्यांची इमेज बिल्डिंग करायची आहे त्यांच्याबद्दल वृत्तपत्रे व वाहिन्यांत कुठल्या बातम्या येतायत, जर विरोधात बातम्या येत असतील तर त्या थोपवण्याकरिता काय उपाययोजना करता येतील, सरकारकडील सहसा पत्रकारांना सहज उपलब्ध न होणारी माहिती देणे, स्वत:हून आपल्या विरोधी पक्षातील किंवा स्वपक्षातील विरोधकांच्या कुलंगड्यांच्या बातम्या देऊन टीकेचा फोकस आपल्यावरून दुसऱ्यांवर जाईल असे पाहणे, अशा पद्धतीने हे इमेज बिल्डिंग करणारे काम पाहत होते. हळूहळू वाहिन्यांची संख्या वाढली. सोशल मीडिया प्रबळ झाला. स्पर्धा तीव्र झाली. अशा वेळी रेडिमेड फुटेज व बातमी जर मिळाली तर लागलीच ब्रेक करणे सोपे होते, हे हेरून राजकीय पक्ष, नेते यांनी पाच ते सहा जणांची टीम बाळगायला सुरुवात केली. यात कॅमेरामन, फोटो एडिटर, मिम्स क्रिएटर, कॉपी रायटर यांचा समावेश असतो.

सोशल मीडियाला संघटनेची साथ हवी
सोशल मीडियावरील प्रचाराला संघटनात्मक ताकद व नेतृत्वाची जोड असणे, उमेदवाराचे काम असणे गरजेचे आहे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले. भाजपने प्रत्येक बूथनिहाय देशभर लाखो व्हॉट्सॲप ग्रुप केले आहेत. कुठलाही संदेश २० सेकंदांत देशभर पोहोचवण्याची यंत्रणा पक्षाकडे आहे. अन्य पक्षही त्याचेच अनुकरण करीत आहेत.

उमेदवाराला मतदार शोधायला होते मदत
उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघापुरता संदेश द्यायचा असतो. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सॲप या माध्यमातून उमेदवार त्यांना कुणापर्यंत जायचे आहे, ती कम्युनिटी निश्चित करू शकतात. खर्च तुलनेने कमी असून उमेदवाराला द्यायचा मेसेज झटपट देता येतो. उमेदवाराबद्दल पर्सेप्शन बदलण्याकरिता खूप फायदा होतो. लोकांच्या प्रतिसादावरून आपला मेसेज त्यांच्यापर्यंत गेला किंवा नाही हे स्पष्ट होते. अल्गोरिदम, डेटा ॲनालिसिस व आर्टिफिशल इंटेलिजन्स या माध्यमातून आता उमेदवाराला सोशल मीडियावरील आपला मतदार कोणता आहे हेही बऱ्यापैकी शोधून त्याला जोडता येते, असे ॲडफॅक्टरचे व्हाइस प्रेसिडेंट परीक्षित जोशी यांनी सांगितले.

Web Title: In the memmories of Lok Sabha Elections, 'Open Facebook, see Candidate'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.