हिरव्या सापांची वळवळ समुद्रात वाढलीय, त्यामुळे...; मीरा भाईंदरमध्ये मंत्री नितेश राणेंचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 11:01 IST2025-12-24T11:00:33+5:302025-12-24T11:01:01+5:30
आमच्या हिंदू राष्ट्राकडे जर कुणी वाकड्या नजरेने बघितले तर तो दोन पायावर शुक्रवारी चालणार नाही याची काळजी घेणारेही आम्ही आहोत असं नितेश राणे यांनी म्हटलं.

हिरव्या सापांची वळवळ समुद्रात वाढलीय, त्यामुळे...; मीरा भाईंदरमध्ये मंत्री नितेश राणेंचं विधान
मीरा रोड - हिरव्या सापांनी वळवळ समुद्रात वाढवल्याने ड्रोनची सुरक्षा सुरू केलीय असं सांगत मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा सूर आवळला आहे. मीरा भाईंदर येथे कोळी समाज बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले की, समुद्रात हिरव्या सापांची वळवळ खूप वाढत आहे त्यामुळे ड्रोनची सुरक्षा वाढवण्यात आली. गोल टोपी आणि दाढीवाले आपल्या हक्काची मासेमारी घेऊन जातायेत. आमच्या उत्तन येथील मच्छिमारांवर अन्याय होत असेल तर तो अन्याय थांबला पाहिजे. कुणालाही त्रास होणार नाही हा शब्द मंत्री म्हणून तुम्हाला देतोय. १५ जानेवारीनंतर मी पुन्हा इथं येणार आहे. याठिकाणी सुसज्ज असे मच्छिमार्केट बनवणार आहे. तुम्ही जिथं सांगाल, जी जागा बोलाल तिथे मच्छिमार्केट उभं करण्याची जबाबदारी माझी आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच आमचं सरकार हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. कोळी समाजाची काळजी घेणारे आहे. आमच्या हिंदू राष्ट्राकडे जर कुणी वाकड्या नजरेने बघितले तर तो दोन पायावर शुक्रवारी चालणार नाही याची काळजी घेणारेही आम्ही आहोत. त्यामुळे १६ जानेवारीला उत्तन भागातील तिन्ही नगरसेवक भाजपाचे आले पाहिजेत. नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वात हा भाग एकदा आमच्या ताब्यात द्या. पुढील ५ वर्ष जो विकास इथं वर्षोनुवर्षे झाला नाही तो आम्ही करू. जे काय तुम्हाला हवे ते मंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी टाका, मी ते द्यायला तयार आहे असंही नितेश राणे यांनी म्हटलं.
दरम्यान, मच्छिमारीला शेतीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय जो देशातील कुठल्याही सरकारने घेतला नाही तो महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात घेतला आहे. जे जे फायदे शेतकऱ्यांना मिळतात, त्या त्या केंद्राच्या आणि राज्याच्या योजना मच्छिमारांना लागू होतायेत. देणारे आम्ही आहोत, तुम्हाला काही अडचणी आल्या तर बाकी कोणी येणार नाही आम्हीच अडचणी दूर करू शकतो. तुम्ही जर आम्हाला मतदान केले तर आम्ही हक्काने तुमच्या अडचणी दूर करू असंही मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.