उल्हासनगरमध्ये अर्धे उमेदवार कोट्यधीश! ९३ कोटींचे मालक भाजपाकडे तर ५७ कोटींचे धनी शिंदेसेनेकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 21:41 IST2026-01-05T21:40:47+5:302026-01-05T21:41:22+5:30
उमेदवारांनी निवणूक अर्ज भरताना सोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रामधील मालमत्तांचे आकडे पाहून सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या श्रीमंतीकडे बघून हेवा वाटत आहे.

उल्हासनगरमध्ये अर्धे उमेदवार कोट्यधीश! ९३ कोटींचे मालक भाजपाकडे तर ५७ कोटींचे धनी शिंदेसेनेकडे
सदानंद नाईक
उल्हासनगर - महापालिका प्रचाराची रणधुमाळी उडाली असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली. उमेदवार निवडताना सामाजिक कामांबरोबर आर्थिक स्थितीचाही विचार पक्षाने केला असून अर्धेअधिक उमेदवार करोडपती आहेत. भाजपाच्या हेमा पिंजानी ९३ कोटीच्या मालक असून शिंदेसेनेचे राजेंद्र सिंग भुल्लर यांनी ५७ कोटीचे धनी आहेत. काँग्रेसचे विजय ठाकूर यांच्याकडे ३८ कोटीची मालमत्ता आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या सत्तेसाठी भाजप विरुद्ध शिंदेसेना युती यांच्यात रस्सीखेच आहे. महाविकास आघाडीनेही सर्वच्या सर्व जागी उमेदवारी देऊन आवाहन निर्माण केले. तर काही ठिकाणी स्थानिक साई पक्ष व वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे. भाजपा व शिंदेसेनेकडे सर्वाधिक कोट्याधीश असून काँग्रेस, उद्धवसेना व मनसे यांच्याकडे लखपती उमेदवारांची संख्या आहे. यावेळी राजकीय पक्षांनी उमेदवार निवडतानाही सामाजिक व आर्थिक बाबीकडेही लक्ष दिल्याचे यातून उघड होते. उमेदवारांनी निवणूक अर्ज भरताना सोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रामधील मालमत्तांचे आकडे पाहून सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या श्रीमंतीकडे बघून हेवा वाटत आहे.
भाजपाच्या हेमा पिंजानी यांची ऐकून मालमत्ता ९३ कोटी ९३ लाख असून त्यांच्या प्रतिज्ञापत्रात विविध कंपनी, जेसीबी मशीन, डंपर, चार चाकी वाहने आदीची नोंद आहे. शिंदेसेनेचे राजेंद्र सिंग यांची ५७ कोटी, ५७ लाखाची मालमत्ता दाखविण्यात आली आहे. आमदार कुमार आयलानी यांच्या पत्नी मीना आयलानी यांची ४४ कोटी, काँग्रेसचे विजय ठाकूर यांची ३८ कोटी, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे भारत राजवानी (गंगोत्री) ३३ कोटी, शिंदेसेनेचे विजय पाटील यांची ३३ कोटी, साई पक्षाचे प्रमुख जीवन ईदनानी यांची २४ कोटी, शिंदेसेनेचे महेश सुखरामानी १२ कोटी, अरुण अशांन ११ कोटी, जया माखीजा १० कोटी, मीनाक्षी पाटील ८ कोटी, भाजपाचे राजेश वधारिया यांची १० कोटी, शिंदेसेनेच्या व आमदार पप्पू कलानी यांची मुलगी सीमा कलानी ९ कोटी अशी मालमत्ता प्रतिज्ञापत्रात दाखविण्यात आली आहे.
कोट्यावधी उमेदवारांची संख्या अर्ध्या पेक्षा जास्त आहे. निवडणुकीत काँग्रेस, उद्धवसेना, मनसे यांची महाविकास आघाडी कायम आहे. त्यांनी काही प्रभागात भाजप व शिंदेसेना युतीला आव्हान दिल्याने, शहरात तिरंगी व चौरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने ४८ ठिकाणी उमेदवार रिंगणात असून या उमेदवारांना भाजप ऐवजी शिंदेसेने मधील ओमी कलानी टीम समर्थक उमेदवारांना बसणार आहे. शहरांत सर्वाधिक श्रीमंत ठरलेल्या हेमा पिंजानी ह्या व्यावसायिक असून मोठ्या वाहनाची संख्या अधिक आहे.