हिरवा रंग अनेक झेंड्यांत; भांडवल तरी किती करायचे? एमआयएमवरून मंत्री गणेश नाईक यांचा घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 11:46 IST2026-01-26T11:45:45+5:302026-01-26T11:46:26+5:30
Ganesh Naik: देशाचा तिरंगा ध्वज आणि इतर राजकीय पक्षांच्या झेंड्यातही हिरवा रंग आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीचे किती भांडवल करायचे? हे प्रत्येकाने ठरविले पाहिजे, अशी रोखठोक भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी एमआयएमच्या ‘हरा कर देंगे’ या वक्तव्यावर रविवारी येथे मांडत भाजपला घरचा आहेर दिला.

हिरवा रंग अनेक झेंड्यांत; भांडवल तरी किती करायचे? एमआयएमवरून मंत्री गणेश नाईक यांचा घरचा आहेर
ठाणे - देशाचा तिरंगा ध्वज आणि इतर राजकीय पक्षांच्या झेंड्यातही हिरवा रंग आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीचे किती भांडवल करायचे? हे प्रत्येकाने ठरविले पाहिजे, अशी रोखठोक भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी एमआयएमच्या ‘हरा कर देंगे’ या वक्तव्यावर रविवारी येथे मांडत भाजपला घरचा आहेर दिला.
भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले यांच्या पाचपाखाडी येथील माजी गणेशोत्सवाला रविवारी दुपारी नाईक यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ते म्हणाले, एमआयएमच्या पक्षाच्या झेंड्याचा रंग हिरवा असल्याने त्यांची नगरसेविका सहर शेख आणि माजी खा. इम्तियाज जलील यांनी मुंब्रा आणि महाराष्ट्र हिरवा करू, अशी राजकीय भूमिका मांडली असेल. आपणही भगवे करू म्हणतो. त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांचे वक्तव्य बरोबर आहे. कायद्याच्या दृष्टीनेही त्याला आव्हान देता येईल, असे वाटत नसल्याचे सांगत त्यांनी इतर पक्षांनाही खडेबोल सुनावले. हिरवा म्हणजे पाकिस्तानचा हिरवा रंग नाही. मोगलांची भूमिका त्यांनी मांडली तर आमचा विरोधच आहे. त्यांचा धिक्कार करू, असेही ते म्हणाले.
एकटे लढलो असतो, तर भाजपचीच सरशी
नवी मुंबईत महापालिकेत जागा वाटपात १११ पैकी ५७ जागा मागत शिंदेसेनेने मोठा भाऊ होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आम्ही भाजपची एकहाती सत्ता आणली.
ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगरमध्ये युती केली नसती तर तेथेही भाजपची सरशी झाली असती, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. युतीमुळे ठाणे आणि कल्याणमध्ये भाजपच्या घोड्यांचे लगाम खेचले गेले. यातून कार्यकर्त्यांची परवड झाली.
तरीही कार्यकर्त्यांनी शिस्त पाळली. युती होऊ नये हे माझे खासगी मत होते. बालेकिल्ले कोणाचेही नसतात, असा थेट इशाराच नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता दिला. मात्र, हे आपले वैयक्तिक मत असल्याचेही ते म्हणाले.
मी कल्याण - डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर येथे महापौर बसविले आहेत. ठाण्यात ती संधी दोन मतांनी हुकली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना जिल्हा परिषद, जिल्हा बँक आमच्या ताब्यातच होती, असेही ते म्हणाले.