Thane Mayor: ठाण्यात ५ वर्षात होणार ४ महापौर; सव्वा वर्षाचा फॉर्म्युला निश्चित, पहिला मान कुणाला मिळाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:52 IST2026-01-30T13:51:12+5:302026-01-30T13:52:27+5:30
Thane New Mayor: महापौर आणि उपमहापौरपदाचा फार्मूला निश्चित झाला असून पहिले सव्वा वर्ष महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर आणि त्यानंतर सव्वा वर्षांनी शिंदेसेनेकडून दुसऱ्या चेहऱ्याला महापौर पदाची संधी मिळेल.

Thane Mayor: ठाण्यात ५ वर्षात होणार ४ महापौर; सव्वा वर्षाचा फॉर्म्युला निश्चित, पहिला मान कुणाला मिळाला?
अजित मांडके
ठाणे - ठाणे महापालिकेच्या महापौरपदी शिंदेसेनेच्या कोपरी मधील नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. तर दोन वर्षासाठी महापौर पद मिळावे अन्यथा विरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपाने आपली भूमिका बदलत सत्तेत राहणे पसंत करत उपमहापौर पदी अर्ज दाखल केला आहे. भाजपाकडून कृष्णा पाटील यांनी नामनिर्देशन दाखल केले. विरोधात कोणीही अर्ज दाखल केले नसल्याने महापौर आणि उपमहापौर या दोघांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
महापौर पदासाठी शिंदेसेनेतून ७ नगरसेवकांची नावे पुढे आली होती. यात विमल भोईर, पद्मा भगत, दीपक जाधव, गणेश कांबळे, आरती गायकवाड, वनिता घोगरे, आणि दर्शना जानकर यांची नावे आघाडीवर होती. मात्र अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा कोपरीवर विश्वास टाकत येथील सलग दोन वेळा निवडून आलेल्या शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांच्यावर विश्वास टाकत त्यांना महापौर पदाची संधी दिली आहे. त्या कोपरी येथील प्रभाग क्रमांक २० मधून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.
दुसरीकडे महापौर पदावर दावा करणाऱ्या भाजपाने अखेर उपमहापौर पदावर समाधान मानले आहे. त्यानुसार शुक्रवारी प्रभाग क्रमांक ११ मधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. विरोधी गटाकडून कोणीही नामनिर्देशन पत्र दाखल न केल्याने महापौर आणि उपमहापौर पदाची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. त्यानुसार येत्या ३ फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
सव्वा वर्ष असणार महापौर आणि उपमहापौर पद
महापौर आणि उपमहापौरपदाचा फार्मूला निश्चित झाला असून पहिले सव्वा वर्ष महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर आणि त्यानंतर सव्वा वर्षाने शिंदेसेनेचा महापौर विराजमान होणार आहे. तसेच भाजपाकडून देखील उपमहापौर पद हे सव्वा वर्षासाठी असणार आहे. त्यानंतर पुन्हा सव्वा वर्षाने उपमहापौर पद ही बदलले जाणार आहे. त्या ठिकाणी दुसरा चेहरा दिला जाणार आहे. असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. महापौर पद शिंदेसेनेकडेच आणि उपमहापौर पद हे भाजपकडेच राहणार आहे.