उल्हासनगरात महापौरपदी शिंदेसेना ओमी टीम समर्थक अश्विनी निकम तर उपमहापौरपद भाजपाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:38 IST2026-01-30T15:36:59+5:302026-01-30T15:38:30+5:30
महापौर पदासाठी शिंदे सेनेतून राजेंद्र चौधरी, इंदिरा पाटील, ओमी टीम समर्थक अश्विनी निकम, डिंपल ठाकूर आदी नगरसेवकांची नावे पुढे आली होती.

उल्हासनगरात महापौरपदी शिंदेसेना ओमी टीम समर्थक अश्विनी निकम तर उपमहापौरपद भाजपाला
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेच्या महापौर पदी शिंदेसेनेतील ओमी टीम समर्थक अश्विनी निकम यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. तर उपमहापौर पदी भाजपचे नगरसेवक अमर लुंड यांनी अर्ज दाखल केला. किती वर्षासाठी महापौर व उपमहापौर पद राहणार याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी सस्पेन्स कायम ठेवला.
उल्हासनगर महापालिकेत शिंदेसेनेने वंचित, साई व अपक्ष नगरसेवकाच्या मदतीने सत्तेसाठीची ४० मॅजिक फिगर गाठली असताना गुरुवारी रात्री भाजप व शिंदेसेनेत बैठक होऊन महायुतीचा निर्णय घेण्यात आला. महायुतीच्या निर्णयानुसार महापौर पद शिंदेसेनेतील ओमी टीमच्या समर्थक अश्विनी निकम व उपमहापौर पदी भाजपाचे अमर लुंड यांचे नावे निश्चित करण्यात आले. त्या दोघांनी महापौर व उपमहापौर नामनिर्देशन दाखल केले. विरोधात कोणीही अर्ज दाखल केले नसल्याने महापौर आणि उपमहापौर या दोघांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
वंचित यांची समजूत
शिंदेसेनेने वंचित यांना उपमहापौर पदासाठी दिलेला शब्द पाळला नाही. मात्र पुढील टर्म मध्ये उपमहापौर पद देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती वंचितचे जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांनी दिली. तसेच ऐक स्वीकृत नगरसेवक देणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.
महापौर पदासाठी शिंदे सेनेतून राजेंद्र चौधरी, इंदिरा पाटील, ओमी टीम समर्थक अश्विनी निकम, डिंपल ठाकूर आदी नगरसेवकांची नावे पुढे आली होती. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी माजी आमदार पप्पू कलानी व ओमी कलानी यांच्यावर विश्वास टाकत पहिल्या टर्म मध्ये निवडून आलेल्या कलानी यांचे कट्टर समर्थक व ओमी टीमचे प्रवक्ते कमलेश निकम यांची पत्नी अश्विनी निकम यांची महापौर पदासाठी नाव निश्चित करण्यात आले. निकम यांना महापौर पद म्हणजे कलानी यांच्या घरच्या सारखेच असल्याचे बोलले जात आहे. त्या खेमानी येथील प्रभाग क्रं-६ मधून पहिल्यांदा निवडून आल्या आहेत. दुसरीकडे उपमहापौर पदासाठी पहिल्यांदा निवडून आलेले अमर लुंड यांचे नाव पुढे येऊन अमर लुंड यांची पत्नी कांचन लुंड दोन टर्म नगरसेवक पदी निवडून आल्या होत्या. अमर लुंड त्यांची पत्नी कांचन लुंड, भाऊ शेरी लुंड हे एकाच घरातील तीन जण नगरसेवक पदी निवडून आले आहेत. विरोधी गटाकडून कोणीही नामनिर्देशन पत्र दाखल न केल्याने महापौर आणि उपमहापौर पदाची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. त्यानुसार येत्या ३ फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा केली जाणार आहे.