गंभीर भाजलेल्या असतानाही त्यांनी रुग्णवाहिकेतून येत भरला अर्ज; दाखवली जिद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:59 IST2025-12-31T13:59:51+5:302025-12-31T13:59:51+5:30
..तर दुसरीकडे नौपाड्यातील भाजपचे उमेदवार सुनेश जोशी यांना रात्री उशीरा तिकीट जाहीर झाले. मात्र सकाळीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. असे असतानाही त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

गंभीर भाजलेल्या असतानाही त्यांनी रुग्णवाहिकेतून येत भरला अर्ज; दाखवली जिद्द
ठाणे : ठाण्यातील प्रभाग क्रमांक २६ (मुंब्रा - शैलशनगर परिसर) मधील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार संगीता दवणे यांनी गंभीर भाजलेल्या अवस्थेतही उमेदवारी अर्ज दाखल करत आपली जिद्द दाखवून दिली. तर दुसरीकडे नौपाड्यातील भाजपचे उमेदवार सुनेश जोशी यांना रात्री उशीरा तिकीट जाहीर झाले. मात्र सकाळीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. असे असतानाही त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
सोमवारी सकाळी घरात जेवण तयार करत असताना अचानक कुकरचा स्फोट झाल्याने दवणे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. मात्र, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने, प्रकृती प्रतिकूल असतानाही त्यांनी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी सकाळी रुग्णवाहिकेतून त्यांनी थेट मुंब्रा प्रभाग समितीचे कार्यालय गाठले. आवश्यक वैद्यकीय कर्मचारी आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
दु:खाचा डोंगर अन् हृदयावर दगड -
ठाणे : माजी नगरसेवक सुनेश जोशी यांना तिकीट मिळणार की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. परंतु रात्री उशिरा त्यांना पक्षाने एबी फॉर्म दिला. त्यांनी मंगळवारी अर्ज भरण्याची तयारी केली होती. अचानक त्यांचे वडील रामचंद्र जोशी यांचे निधन झाले. एकीकडे दु:खाचा डोंगर आणि दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असताना त्यांनी हृदयावर दगड ठेवून आपला उमेदवारी अर्ज भरला.
समाजवादी उत्तर भारतीयांसाेबत -
मुंबई : समाजवादी पक्षाचा उमेदवार नसलेल्या प्रभागातील अपक्ष उत्तर भारतीय उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी जाहीर केला आहे. मुंबईतील विविध राजकीय पक्षांत उत्तर भारतीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यरत आहेत, मात्र ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांना जाणीवपूर्वक डावलले गेल्याचा आरोप आझमींनी केला आहे. उत्तर भारतीयांवरील अन्यायाविरोधात समाजवादी पक्ष लढेल, असे त्यांनी जाहीर केले.