दरेगावाहून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील घरी परतले; प्रकृतीमध्ये सुधारणा
By जितेंद्र कालेकर | Updated: December 1, 2024 19:20 IST2024-12-01T19:20:08+5:302024-12-01T19:20:27+5:30
उपमुख्यमंत्री पदाबाबत काेणती भूमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष

दरेगावाहून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील घरी परतले; प्रकृतीमध्ये सुधारणा
ठाणे: राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी(1 डिसेंबर 2024) सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील खासगी निवासस्थानी सुखरुप परतले. ते सातारा जिल्हयातील त्यांच्या दरेगावी गेले हाेते. प्रकृती बिघडल्यामुळे दाेन दिवस ते आपल्या गावीच मुक्कामी हाेते. आता आपल्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असल्याचे माध्यमांना त्यांनी सांगितले.
शिंदे यांचे ठाण्यातील रेमंड कंपनीच्या हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर शिंदे सेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. आपल्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर केसरकर यांच्या समवेतच शिंदे हे त्यांच्या ठाण्यातील नितीन कंपनी जवळील शुभदीप, या खासगी निवासस्थानी मार्गस्थ झाले. यावेळी त्यांच्यासमवेत खा. श्रीकांत शिंदे हेही हाेते.
'भाजपच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा; आमच्या मनात किंतु परंतु नाही,' एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती
खा. शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद दिले जाणार का? की ते शिंदे सेनेच्या अन्य आमदाराकडे दिले जाणार? यापैकी काेणत्याही प्रश्नावर शिंदे यांनी उत्तर देण्याचे प्रकर्षाने टाळले. त्यामुळे उपमुख्यमंत्री काेण हाेणार? गृहमंत्रीपदाबाबत काेणता निर्णय काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या आमदारांकडून घेतला जाणार हे सर्व अद्यापही गुलदस्त्यात आहे.
सत्ता स्थापनेच्या फाॅर्म्यूल्याबाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची २८ नाेव्हेंबर राेजी नवी दिल्लीमध्ये बैठक झाली हाेती. याच बैठकीनंतर शिंदे हे २९ नाेव्हेंबर राेजी साताऱ्यातील त्यांच्या दरेगावी गेले हाेते. आपण नाराज नसून केवळ आराम करण्यासाठी गावी आल्याचे त्यांनी स्पष्ट केले हाेते. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात आले हाेते. त्यांच्या प्रकृती बिघाडामुळे महायुतीच्या तिन्ही नेत्यांची मुंबईमध्ये एकत्रित हाेणारी बैठक लांबणीवर पडली हाेती. ही बैठक आता लवकरच हाेणार असल्यामुळे याच बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री पद, गृहमंत्री पदासह अन्यही खात्यांबाबत चर्चा हाेऊन ताेडगा काढला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.