शेवटच्या क्षणापर्यंत प्रचाराचा धुरळा; सर्वपक्षीय नेते, उमेदवारांनी लावला जोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:12 IST2026-01-14T11:12:52+5:302026-01-14T11:12:52+5:30
प्रचारासाठी मिळणारा एक मिनिटही वाया जाऊ द्यायचा नाही असे प्रयत्न सर्वांचे होते.

शेवटच्या क्षणापर्यंत प्रचाराचा धुरळा; सर्वपक्षीय नेते, उमेदवारांनी लावला जोर
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या राजकीय प्रचाराची धुळवड मंगळवारी ५ वाजता संपली. मात्र, शेवटच्या दिवशी सकाळी अनेकांनी सुरू केलेला प्रचार सायंकाळी वेळ संपण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार सुरू होता. विविध प्रभागात रॅली, पदयात्रा काढून मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांसह नेते मंडळीची धावपळ होत होती. मात्र, प्रचारासाठी मिळणारा एक मिनिटही वाया जाऊ द्यायचा नाही असे प्रयत्न सर्वांचे होते.
२४ प्रभागांतील ९५ जागांसाठी ४३४ उमेदवार मैदानात आहेत. शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांसह नेते, कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी जोर मारला. सकाळपासूनच सर्वत्र ढोल-ताशांच्या आवाजाने, भोंगे, रेकॉर्ड केलेले आवाहन, गाणी व घोषणांनी शहर गजबजून गेले होते. कुठे पदयात्रा तर कुठे दुचाकी रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन केले गेले. सकाळपासून उद्यानात जाऊन काहींनी मतदारांची भेट घेतली तर ठिकठिकाणी सभागृहांमध्ये सभा बैठका झाल्या. -शेवटच्या दिवशीही उमेदवारांची जास्तीतजास्त मतदारांशी संपर्क साधण्यासाठी धावपळ चालली होती.
मतदारांची मने वळविण्यासाठी शेवटच्या सायंकाळी प्रचार संपल्यानंतर ठिकठिकाणी उमेदवार, कार्यकर्ते दिसत होते. काहीसे विसावलेले दिवशी तहान-भूक विसरून उमेदवार फिरत होते. शेवटच्या दिवशी सर्वांनाच प्रचार करायचा असल्याने पोलिसांची आणि निवडणूक अधिकारी कर्मचारी यांचेदेखील परवानग्यांचे नियोजन करताना कसब लागले होते. अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती.
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सकाळपासून उद्यान आदी भागातील मतदारांची भेट घेतली. त्यांनी विविध प्रचार बैठका घेतल्या. काही कार्यक्रमांना त्यांनी भेटी दिल्या. शिंदेसेनेच्या वतीने परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दुचाकी रॅली काढली. सुभाषचंद्र बोस मैदानापासून भाईंदर पश्चिम परिसरातून भाईंदर पूर्व व पुढे मिरा रोडवरून जेपी नॉर्थ संकुलाजवळ रॅली संपली. वाटेत मंत्री सरनाईक हे लोकांच्या भेटीगाठी घेत होते. काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी प्रचार फेऱ्यांमध्ये सहभाग घेतला. काही ठिकाणी भाषणे केली. लोकांच्या भेटीगाठी करत उमेदवारांसह प्रचार केला.
उद्धवसेना, मनसे, राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (शरद पवार), वंचित, एमआयएम व अन्य पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीदेखील उमेदवारांसह प्रचारात जोर लावला होता.