भाजप कार्यालयात तोडफोड, काँग्रेस कार्यालयात धक्काबुक्की; एबी फॉर्मचे वाटप सुरू होताच असंतोष आला उफाळून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:27 IST2025-12-31T13:19:50+5:302025-12-31T13:27:10+5:30
बाहेरून आलेल्यांना तिकीट दिल्याने भाजपमधील नाराजांनी सोमवारी रात्री उशिरा वर्तकनगर येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करीत तोडफोड केली. तसेच, पैसे घेऊन बाहेरच्यांना तिकीट देतात, असा आरोपही केला...

भाजप कार्यालयात तोडफोड, काँग्रेस कार्यालयात धक्काबुक्की; एबी फॉर्मचे वाटप सुरू होताच असंतोष आला उफाळून
ठाणे : महापालिका निवडणुकीकरिता सोमवारी (दि. २९) रात्रीपासून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू होताच ठाण्यातील भाजप, शिंदेसेना व काँग्रेस या पक्षांत तीव्र असंतोष उफाळून आला. बाहेरून आलेल्यांना तिकीट दिल्याने भाजपमधील नाराजांनी सोमवारी रात्री उशिरा वर्तकनगर येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करीत तोडफोड केली. तसेच, पैसे घेऊन बाहेरच्यांना तिकीट देतात, असा आरोपही केला.
टेंभीनाका येथील आनंद आश्रमातून रात्री फॉर्मवाटप सुरू झाले. यावेळी इच्छुक उमेदवार व त्यांचे हजारो समर्थक जमा झाले. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाण्यातील काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात सोमवारी रात्री एबी फॉर्मवाटपाच्या वेळी मोठा गोंधळ झाला. पालिका निवडणुकीकरिता उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया सुरू असताना, सुरू झालेला शाब्दिक वाद काही वेळातच शिवीगाळ, धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला.
भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत प्रभाग क्रमांक १५ मधील माजी नगरसेविका वर्षा पाटील, सुवर्णा कांबळे आणि माजी नगरसेवक राजकुमार यादव यांची नावे नसल्याने इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष दिसला.
संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयात गर्दी करत घोषणाबाजी केली व कार्यालयात तोडफोड केली. या गोंधळामुळे दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे उमेदवारी अर्जासाठी आलेले उमेदवार आत अडकून पडले. नाराज इच्छुकांनी आ. संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
नाराजांची समजूत काढताना तोंडाला फेस
आनंद आश्रम येथे दुपारी एक वाजेपर्यंत एबी फॉर्म दिले जात होते. यावेळी नाराजीचा वरचेवर उद्रेक पाहायला मिळत होता. सुरुवातीला काही काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे आश्रमात हजर होते. मात्र, इच्छुकांची नाराजी पाहिल्यावर ते निघून गेले. खा. नरेश म्हस्के व रवींद्र फाटक यांनीच अनेक नाराजांची समजूत काढली. ठाण्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील गोंधळाची माहिती मिळताच ठाणे नगर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.