ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:13 IST2025-12-25T18:12:21+5:302025-12-25T18:13:51+5:30
सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून मी या पदावर काम करण्यास असमर्थ असून मी माझ्या पदाचा त्याग करत आहे असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
ठाणे - नाशिकमध्ये भाजपातील नाराजीनाट्य समोर आले असताना दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष शिंदेसेनेतही नाराजी पसरल्याचं समोर आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जाणाऱ्या ठाण्यात निष्ठावंताला डावलल्यामुळे माजी महापौरांनी राजीनामा दिला आहे. ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या संघटक आणि ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामागे निकटवर्तीयाची शाखाप्रमुखपदावरून केलेली हकालपट्टी हे कारण असल्याचे बोलले जाते.
मिनाक्षी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, या पत्राद्वारे मी ठाणे जिल्हा महिला आघाडी जिल्हा संघटक यापदाचा राजीनामा देत आहे. आजवर पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी पक्षाची आणि सर्व वरिष्ठ नेत्यांची ऋणी आहे. वैयक्तिक कारणास्तव आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून मी या पदावर काम करण्यास असमर्थ असून मी माझ्या पदाचा त्याग करत आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
काय आहे कारण?
माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेचे माजी नगरसेवक भूषण भोईर यांना पुन्हा तिकिट मिळू नये यासाठी शिवसैनिक आणि शाखाप्रमुखाने आंदोलन केले होते. मात्र त्याच आंदोलनकर्त्या शाखाप्रमुखावर पक्षशिस्त भंगाचा ठपका ठेवून पदावरून निलंबित करण्याची कारवाई केली गेली. या निलंबित शाखाप्रमुखाचं नाव विक्रांत वायचळ असून ते मनोरमा नगरातील निर्मल आनंदनगर शाखेचे प्रमुख होते. हे वायचळ मिनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे वायचळ यांच्यावर कारवाई झाल्यानंतर मिनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता मिनाक्षी शिंदे यांची नाराजी कशी दूर केली जाते हे पाहणे गरजेचे आहे.
नाशिकमध्ये भाजपा कार्यकर्त्यांमध्ये असंतोष
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सध्या पक्षांतराचे जोरदार वाहू लागले आहेत. त्यात विरोधी पक्षातील नेते फोडून आपापल्या पक्षात प्रवेश करून घेण्यामध्ये सत्ताधारी महायुतीत चढाओढ लागली आहे. त्यात आज नाशिक येथे ठाकरे बंधू यांच्याकडील ५ नेते भाजपात सामील झाले परंतु यांच्या पक्षप्रवेशाला आमदार देवयानी फरांदे आणि भाजपा कार्यकर्त्यांनी विरोध केला. या पक्षप्रवेशावेळी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. मात्र फरांदे यांच्या नाराजीनंतरही मंत्री गिरीश महाजन यांनी हे पक्षप्रवेश पार पाडून घेतले. त्यामुळे फरांदे यांच्या डोळ्यात अश्रू आले.