‘सप’तील संघर्ष काँग्रेसला तारक की मारक?
By नितीन पंडित | Updated: January 5, 2026 10:01 IST2026-01-05T10:00:10+5:302026-01-05T10:01:23+5:30
काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष चिघळवण्याची ही सपची खेळी आहे की त्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे पक्षाची यशाची संधी हुकणार, याचे उत्तर निकालानंतर समजेल.

‘सप’तील संघर्ष काँग्रेसला तारक की मारक?
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : भिवंडी पालिका निवडणुकीत मागील वेळी काँग्रेसला घवघवीत यश मिळाले होते. यावेळी काँग्रेसला अंतर्गत संघर्षामुळे उतरती कळा लागली असताना व समाजवादी पक्षाला संधी असताना आ. रईस शेख व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यातील संघर्ष उफाळून आला. आझमींनी तिकिटे कापल्याने शेख यांनी समर्थकांना काँग्रेसमधून उमेदवारी मिळवून दिली. यामुळे काँग्रेसमधील इच्छुक बिथरले. काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष चिघळवण्याची ही सपची खेळी आहे की त्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे पक्षाची यशाची संधी हुकणार, याचे उत्तर निकालानंतर समजेल.
मनपा निवडणुकीत भाजप-शिंदेसेनेच्या युतीला काँग्रेस व सपचे आव्हान आहे. पूर्व मतदारसंघात काँग्रेसची फारशी ताकद नसतानाही सपचे आ. रईस शेख व प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यातील अंतर्गत वादामुळे शेख यांनी थेट काँग्रेसला मदत करत पूर्व विधानसभेत सपच्या २० हून अधिक उमेदवारांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार उभे केले. त्यामुळे पूर्वेत काँग्रेसला पुनरुज्जीवन मिळाले. या बंडाचा फायदा काँग्रेसला होत असला तरी युतीला रोखणे हे काँग्रेससमोरील मोठे आव्हान आहे. इतर ठिकाणी तुटलेली युती भिवंडीत टिकविण्यात भाजप व शिंदेसेनेला यश आले. भाजपने ३१ जागांवर, तर शिंदेसेनेने २१ जागांवर असे ५२ जागांवर आपले उमेदवार उभे केले. त्यातच भाजपचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने युतीचे पारडे जड झाले.
प्रभाग १ मध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या कोणार्क विकास आघाडीच्या विरोधात भाजपचे आ. महेश चौघुले यांनी पहिल्यांदा आपले पॅनल उभे केले. आ. चौघुले यांचा मुलगा मित चौघुले हा या प्रभागात प्रभाग १ क मधून माजी महापौर विलास पाटील यांचा मुलगा मयूरेश पाटील याच्या विरोधात लढत आहे. याच प्रभागात प्रभाग १ ब मध्ये माजी महापौर प्रतिभा विलास पाटील, तर प्रभाग १ -ड मध्ये स्वतः विलास पाटील निवडणूक लढत आहेत. विधानसभेपासून आ. चौघुले व विलास पाटील यांच्यातील वाद सुरूच असल्याने प्रभाग एकच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष आहे.
कोणताच पक्ष शहरातील सर्व जागा लढवणार नाही
कोणताच राजकीय पक्ष शहरातील सर्व जागा लढवणार नाही. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ५७ जागी उमेदवार उभे केले आहेत, तर त्या खालोखाल समाज पक्षाने ५० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजपने ३२ जागी उमेदवार उभे केले, तर शिंदेसेना २१, उद्धवसेना २७, राष्ट्रवादी (अजित पवार)ने २४, तर राष्ट्रवादी (शरद पवार)ने ४१ उमेदवार उभे केले आहेत. मनपाच्या एकूण २३ प्रभागांमध्ये ९० जागांसाठी निवडणूक होत असून सहा जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आता ८४ जागांसाठी ४३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.