भिवंडीत भाजप-काँग्रेसमध्ये हाणामारी; प्रचार रॅलीवरून शाब्दिक बाचाबाची, वाद विकोपाला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 09:23 IST2026-01-04T09:23:01+5:302026-01-04T09:23:38+5:30
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

भिवंडीत भाजप-काँग्रेसमध्ये हाणामारी; प्रचार रॅलीवरून शाब्दिक बाचाबाची, वाद विकोपाला अन्...
लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : भिवंडीत शनिवारी सायंकाळी नारपोली भंडारी चौक या ठिकाणी प्रभाग क्रमांक २० येथील भाजप व काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला गेल्याने दोन्ही गटांत बेदम हाणामारी झाली. दोन्ही गटांकडून काठ्या व दगडांचा मारा केल्याने या हाणामारीत दोघे जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
भंडारी चौक नारपोली येथील वॉर्ड क्रमांक २० येथे भाजप उमेदवार यशवंत टावरे व काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल यांचे कार्यालय रस्त्यात समोरासमोर आहे. सायंकाळी काँग्रेस उमेदवारांची प्रचार रॅली या भागात आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाकडे जात जोरदार घोषणाबाजी केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. या घोषणाबाजीमुळे दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाल्यानंतर दोन्हीकडून दगड भिरकावले.
हाणामारीच्या ठिकाणी चौकात व रॅलीत पोलिस बंदोबस्त असतांनाही दोन गटांत तुफान राडा झाला. घटनास्थळी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त सचिन सांगळे यांनी भेट देत परिस्थिती शांत केली आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूकडून पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात येत आहे.