वहिनीच्या माघारीनंतरही शिंदेंनी ठेवले स्टेट्स; जाब विचारायला गेलेल्या बाळासाहेबाचा गेम, समेट घडवण्यासाठी दोनवेळा बैठका झाल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 16:17 IST2026-01-03T16:16:22+5:302026-01-03T16:17:24+5:30
आठ वर्षांपूर्वी घेतलेली शपथ विसरले अन् खुनात पर्यवसान झाले

वहिनीच्या माघारीनंतरही शिंदेंनी ठेवले स्टेट्स; जाब विचारायला गेलेल्या बाळासाहेबाचा गेम, समेट घडवण्यासाठी दोनवेळा बैठका झाल्या
सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे (वय ३१, रा. जोशी गल्ली, रविवार पेठ) याचा खून केल्याप्रकरणी प्रभाग दोनमधील भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे, तिचा पती शंकर शिंदेंसह पंधरा जणांवर जेलरोड पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत बाजीराव पांडुरंग सरवदे (वय २७, रा. जोशी गल्ली, रविवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, रेखा आणि दादासाहेब सरवदे यांच्याविरोधात खुन्नस देणारा व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवल्यामुळे घटना घडल्याचे माहितगारांनी सांगितले.
यात शालनसह अमर शंकर शिंदे, विशाल शंकर शिंदे, अतिश शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, राहुल राजू सरवदे, ईश्वर सिध्देश्वर शिंदे, रोहित राजू सरवदे, तानाजी बाबू शिंदे, महेश शिवाजी भोसले, शंकर बाबू शिंदे, शिंदे, अनिल शंकर शिंदे, शारदा तानाजी शिंदे, आलोक तानाजी शिंदे, विशाल संजय दोरकर (सर्व रा. सोलापूर) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शालन, शंकर शिंदेसह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी बाजीराव यांची चुलत वहिनी रेखा दादासाहेब सरवदे यांनी अपक्ष म्हणून मनपा निवडणुकीसाठी अर्ज केला होता. यात प्रभागातील माजी नगरसेवक शालन शिंदे यांनीही उमेदवारी अर्ज केला होता. शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आरोपींनी आमच्या विरोधात तुम्ही निवडणुकीकरिता उभे राहू नका, तुमचा अपक्ष फॉर्म काढून घ्या, नाहीतर तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली. यामुळे त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून रेखा सरवदे यांनी निवडणुकीचा अर्ज मागे घेतला.
दरम्यान, शिंदे आणि सरवदे यांच्यात समेट घडविण्यासाठी दोन वेळा बैठका झाल्या. त्यांनी शपथाही घेतल्या होत्या; पण व्यर्थ ठरल्याचे माहितागारांनी सांगितले.
डोळ्यात चटणी अन् तलवारीने वार
सायंकाळी ४:४५ च्या सुमारास फिर्यादी बाजीराव व त्यांचे बंधू हे घराशेजारील हनुमान मंदिराजवळ थांबलेले असताना अमर, ईश्वर शिंदे यांनी आम्ही जिंकलो असे जोरजोरात ओरडत फिरत होते. याबाबत विचारणा केल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, आम्ही काहीही करू असे म्हणून भांडण करू लागले. तेव्हा शंकर शिंदे याने यांना जिवंत सोडायचे नाही, यांना लई मस्ती आली आहे असे म्हणाला. त्यावेळी तानाजी, विशाल शिंदे हे तलवार घेऊन अलोक शिंदे, दादू दोरकर यांनी कोयता घेऊन आले. त्यावेळी उमेदवार शालन आणि शारदा यांनी मृत बाळासाहेबाच्या डोळ्यात चटणी टाकली. याचाच फायदा घेऊन मृत बाळासाहेब याचा राहुल व सुनील सरवदे यांनी हात पकडून ठेवला तर तानाजी व विशाल शिंदे यांनी तलवारीने वार करून जखमी केले.
बाळासाहेब खाली पडल्यावर आरोपी विशाल हा दंड थोपटल्याचे नमूद आहे.
प्रभाग २ मधील अर्ज मागे घेण्यासाठी भाजपची धडपड
सोलापूर : महापालिकेच्या प्रभाग २ मध्ये भाजपचे किरण देशमुख आणि शालन शिंदे यांच्या विरोधात दाखल झालेले अर्ज मागे घेण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते शुक्रवारी दिवसभर प्रयत्नशील होते. हा अंदाज आल्यामुळे शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी शिंदेसेनेचे उमेदवार गणेश कुलकर्णी यांना आपल्या घरात आणून ठेवले होते. भाजपचे किरण देशमुख यांच्या विरोधात नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी राष्ट्रवादी अजित पवार मुस्ताक पटेल, अपक्ष हुसेन बागवान, सोमनाथ रगबले, चंद्रकांत रमणशेट्टी,
बाळासाहेब सरवदेची मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्षाचे नेते अमित ठाकरे यांनी त्याला निवडीचे पत्र दिले होते. तो क्षण.
धरीराज रमणशेट्टी, अब्दुल शेख या सहा जणांनी माघार घेतली. उद्धवसेनेचे दिनेश चव्हाण, शिंदेसेनेचे राजेंद्र कुलकर्णी, जयश्री भोसले या तिघांचे अर्ज दुपारी दोन वाजेपर्यंत कायम होते. या तिघांनी माघार व्हावी आणि देशमुख यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होता.
दरम्यान, शालन शिंदे यांच्या विरोधात चार जणांनी अर्ज दाखल होते. यापैकी रेखा सरवदे, देवयानी रमणशेट्टी यांनी माघार घेतली. उद्धवसेनेच्या आफरीन पठाण, अपक्ष हमिदा पटेल यांचा अर्ज कायम राहिला.
सकाळी मुलींना बाळासाहेबांनी घास भरविला; दुपारी वडिलांचे प्रेत पाहताच दोघींनी हंबरडा फोडला
सोलापूर : जोशी गल्लीत झालेल्या हत्याकांडातील मृत बाळासाहेब सरवदे यांना दोन मुली असून मोठी मुलगी आराध्या इयत्ता पहिलीत शिकत आहे, तर दुसरी लहान मुलगी त्रिशा ही साडेतीन वर्षांची आहे. हत्या होण्यापूर्वी सकाळी बाळासाहेबांनी आपल्या लाडक्या मुलींना स्वतःच्या हाताने घास भरविला. त्यांच्यासोबत काही वेळ घालवल्यानंतर ते घराबाहेर पडले.
मात्र, दुपारी अचानक आपल्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहताच आराध्या अन् त्रिशाने एकच हंबरडा फोडला. ही दुर्दैवी घटना पाहणाऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर झाले.
मृत बाळासाहेब सरवदे यांची पत्नी वंदना यांचेही अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. त्या जोरजोरात रडत असल्यामुळे त्यांच्या दोन्ही मुली प्रचंड घाबरलेल्या दिसल्या. दोन्ही मुली आपल्या आजीसोबत होत्या, तर नातेवाईक वंदना यांना धीर देताना दिसले. जोशी गल्लीतील जुना बोरामणी नाक्याजवळील श्री इंद्र भवानी देवी मंदिराजवळ बाळासाहेब सरवदे यांचे घर आहे. घरासमोर सर्व नातेवाईक जमलेले होते. परिसरात प्रचंड शोकाकुल वातावरण पसरले आहे.
जोशी गल्लीच्या मुलींना पोलिस बनविण्याचे होते स्वप्न
लाडक्या मुलींवर बाळासाहेब यांचे खूप प्रेम होते. दोन्ही मुलींना पोलिस बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते. मोठी मुलगी आराध्याला शाळेत सोडण्यासाठी ते स्वतः जायचे.
यंदा ती गड्डा यात्रेत वडिलांसोबत मनसोक्त खेळणी खरेदी करण्याची इच्छा आराध्या वारंवार व्यक्त करायची. लाडाने बाळासाहेब तिची इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासनही द्यायचे.
रस्त्यांवर दगड व विटांचा कच पडलेला दिसला. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून जोशी समाजातील मान्यवर मंडळी देखील हताश व निराश झालेली आहेत.