"मी काय चुकीची गोष्ट केली?"; CM फडणवीसांना प्रत्युत्तर देताना शरद पवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 13:30 IST2024-12-08T13:10:00+5:302024-12-08T13:30:19+5:30

Markadwadi : मारकडवाडीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sharad Pawar has responded to CM Devendra Fadnavis criticism of Markadwadi | "मी काय चुकीची गोष्ट केली?"; CM फडणवीसांना प्रत्युत्तर देताना शरद पवारांचा सवाल

"मी काय चुकीची गोष्ट केली?"; CM फडणवीसांना प्रत्युत्तर देताना शरद पवारांचा सवाल

Sharad Pawar on CM Devendra Fandnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून सोलापुरातील मारकडवाडी हे गाव देशभरात चर्चेत आलं आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या गटाने ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे जानकर गटाच्या काही ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचे नियोजन केलं होतं. मात्र प्रशासनाच्या विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. शरद पवार यांनीही या वादात उडी घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र डागलं होतं. त्यानंतर आता मारकडवाडीतूनच शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या वापराला विरोध करत सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावात काही ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी उत्तमराव जानकर गटाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली. मात्र ही मतदान प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत नसल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिला आणि जानकर यांच्यासह १०० जणांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर उत्तमराव जानकर यांनी ही निवडणूक प्रक्रिया रद्द केली. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे मारकडवाडी ग्रामस्थांसोबत संवाद साधण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर भाष्य केलं.

रविवारी शरद पवार हे मारकडवाडीत पोहोचले होते. यावेळी शरद पवार यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणाऱ्या मारकडवाडीतील ग्रामस्थांचे म्हणणे ऐकूण घेतले. "निवडणुकीमध्ये कोणी जिंकतं तर कोणी हरतं. पण महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत लोकांच्या मनात निवडणूक प्रक्रियेवर साशंकता आहे आणि मतदारांना विश्वास वाटत नाही. आम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका लढवतो. मतदार मतदानासाठी जातात आणि आत्मविश्वासाने बाहेर पडतात पण काही निकालांमुळे लोकांमध्ये शंका निर्माण झाली आहे," असं शरद पवार म्हणाले.

"आज जगात कुठेच ईव्हीएमचा वापर होत नाही. मग भारताच याचा वापर का सुरू आहे.  तुमच्या गावाने एका वेगळ्या पद्धतीने जायचे ठरवले तर सरकाने तुमच्याविरोधात खटला भरला. माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्याची सर्व माहिती मला द्या. याबाबतची तक्रार आम्ही राज्याचा निवडणूक आयोग, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे देऊ," असंही शरद पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

"मी निवडणुकीच्या निकालावर भाष्य केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, पवार साहेबांनी हे करणे योग्य नाही. मी काय चुकीची गोष्ट केली? तुमच्या गावी येणे, तुमचे म्हणणे ऐकून घेणे चुकीचे आहे? लोकांच्या मनात काही शंका आहेत. त्याबद्दल जाणून घेणे, त्याचे निरसन करणे चुकीच आहे का?” असा सवाल शरद पवारांनी केला.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत शरद पवारांवर भाष्य केलं होतं. “पवार साहेब आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल. तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
 

Web Title: Sharad Pawar has responded to CM Devendra Fadnavis criticism of Markadwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.