"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:27 IST2026-01-09T17:24:39+5:302026-01-09T17:27:33+5:30
एआयएमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य केले. अजित पवारांना मत म्हणजे भाजपाला मत असल्याचे ते म्हणाले.

"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला
राज्यातील २९ महापालिकांमध्ये असदुद्दीन ओवैसी यांची 'एआयएमआयएम'ही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ओवैसी पक्षाच्या उमेदवारांसाठी ठिकठिकाणी सभा घेत आहेत. सोलापूरमध्ये झालेल्या प्रचारसभेत ओवैसींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अजित पवारांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत आहे, अशी टीका त्यांनी केली. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे एक दिवस या देशाची पंतप्रधान हिजाब घातलेली महिला बनेल, असे विधान त्यांनी केले.
सोलापूरमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांसाठी खासदार आणि पक्षाचे प्रमुख असदुद्दीने ओवैसी यांनी प्रचारसभा घेतली.
'हिजाब घालणारी महिला पंतप्रधान होईल'
ओवैसी म्हणाले, "पाकिस्तानच्या घटनेमध्ये लिहिले आहे की, एकाच धर्माचा माणूस पंतप्रधान बनू शकतो. इतर कोणी नाही. पण, बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमध्ये कोणीही भारतीय पंतप्रधान बनू शकतो. एक दिवस असा येईल की, हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल, तो दिवस बघण्यासाठी कदाचित मी जिवंत नेसन, पण हा दिवस नक्कीच येईल", असे विधान ओवैसींनी केले.
'अजित पवारांना मत म्हणजे मोदींना मत'
सोलापूरमध्ये अनेक प्रभागांमध्ये एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात सामना आहे. त्याच मुद्द्यावर बोलताना ओवैसी म्हणाले, "देशाच्या संसदेत बोलणारा मी आहे. अजित पवार हे नरेंद्र मोदींच्या मांडीवर बसले आहेत. अजित पवारांना मत म्हणजे मोदींना मत. अजित पवारांना मत म्हणजे मोदींनी आणलेल्या वक्फ कायद्याला समर्थन आहे."
"अजित पवारांना दर्गा, मशिदीशी काही देणे-घेणे नाही. मोदी, शिंदे, अजित पवार हे त्रिमूर्ती एक आहेत. ते तुमच्यासमोर येऊन तुमच्या डोळ्यात धूळफेक करतील. त्यांना मतपेटीतून उत्तर द्यावे लागेल", अशी टीका ओवैसींनी अजित पवारांवर केली.
ओवैसी पुढे म्हणाले की, "एमआयएम गरिबांमुळे सुरू झाली. गरिबांसाठी काम करते. कोणी तरी म्हटले की, माझ्या शेरवानीला हात लावू. तुमचा जो राजकीय बाप आहे, अजित पवार. त्याला समोर बस म्हणा. तीन मिनिटात त्याला गप्प केलं नाही, तर मला ओवैसी म्हणून नका."
...तर मी तुमच्या बापाबद्दल बोलायला सुरू करेन
"या नई जिंदगी परिसरातूनच काही वर्षांपूर्वी तुम्ही एमआयएमला संजिवनी दिली. एमआयएमला पुन्हा एकदा निवडून देण्याची विनंती करण्यासाठी आज मी इथे आलो आहे. भाजपा, आरएसएस, अजित पवार, शिंदेंचे लोक या नई जिंदगी परिसराला बदनाम करण्याचे प्रयत्न करतात. त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की, हा परिसर ओवैसींचा आवडता आहे. हा परिसर सोलापूरचे ह्रदय आहे. जर तुम्ही या परिसराबद्दल काही चुकीचे बोललात तर मी तुमच्या बापाबद्दल बोलायला सुरू करेन", असा इशारा ओवैसींनी भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार), शिंदेसेनेच्या नेत्यांना दिला.