सोलापुरात राम सातपुतेंची धाकधूक वाढणार?; विजयसिंह मोहिते पाटलांनी घेतली राजन पाटलांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 01:22 PM2024-04-19T13:22:11+5:302024-04-19T13:25:08+5:30

विजयसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असणारे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आहे.

mohol Vijay Singh Mohite Patil met Rajan Patil for solapur lok sabha seat | सोलापुरात राम सातपुतेंची धाकधूक वाढणार?; विजयसिंह मोहिते पाटलांनी घेतली राजन पाटलांची भेट

सोलापुरात राम सातपुतेंची धाकधूक वाढणार?; विजयसिंह मोहिते पाटलांनी घेतली राजन पाटलांची भेट

Solapur Lok Sabha ( Marathi News ) : माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावलण्यात आल्याने मोहिते पाटील कुटुंबाने वेगळी वाट पकडत भाजपपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर पवारांनी धैर्यशील मोहिते पाटलांनी माढ्याची उमेदवारीही जाहीर केली आहे. मोहिते पाटलांच्या पक्षांतरामुळे माढ्यासह सोलापूरचंही राजकीय गणित बदलण्याची चर्चा सुरू आहे. अशातच विजयसिंह मोहिते पाटील यांनी सध्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असणारे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आहे.

अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीचा घटकपक्ष असल्याने राजन पाटील यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार राम सातपुते यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र सोलापुरातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यामुळे शिंदे यांना पाठिंबा देण्याची विनंती करण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटलांनी मोहोळच्या राजकारणावर वर्चस्व असणाऱ्या राजन पाटलांची भेट घेतल्याचे समजते. 

त्रिकुटाच्या भेटीनंतर हालचालींना वेग

अकलूज येथे शिवरत्न बंगल्याच्या एका बंद खोलीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी खा. विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांची काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. या बैठकीत सोलापूर आणि माढा लोकसभेबाबत चर्चा झाली होती. या चर्चेच्या पार्श्वभूमीवरच आता विजयसिंह मोहिते पाटलांनी राजन पाटील यांची भेट घेतल्याचं दिसत आहे.

दरम्यान, विजयसिंह मोहिते पाटलांच्या भेटीनंतर राजन पाटील यांनी अद्याप आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आधी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा जाहीर करणारे राजन पाटील आता प्रणिती शिंदे यांना साथ देण्याबाबत विचार करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: mohol Vijay Singh Mohite Patil met Rajan Patil for solapur lok sabha seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.