Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 20:08 IST2024-10-19T20:08:36+5:302024-10-19T20:08:57+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उमेदवार ठरविण्याचा कस : पुन्हा मोहिते-पाटील विरुद्ध शिंदे घराण्यात रस्सीखेंच

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
सोलापूर : महाआघाडीच्या जागा वाटपात लाकम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माळशिरस, करमाळा, माढा, पंढरपूर, मोहोळ, शहर उत्तर या सहा जागांसाठी आग्रही आहेत. माळशिरस, करमाळ्याचे उमेदवार जवळपास निश्चित आहेत. उर्वरित तीन जागांवरील उमेदवार निवडीचे गणित चुकल्यास पवार गटाचे जिल्ह्यातील राजकारणही बिघडण्याची चिन्हे असल्याचे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत. लोकसभेत माढ्यातून खा. धैर्यशील मोहिते-पाटील निवडून आले. या निकालानंतर मोहिते-पाटील गटाने जिल्ह्यात हात-पाय पसरायला सुरुवात केली. यातून शरद पवार एकनिष्ठ पदाधिकारी आणि मोहिते-पाटील गटाचे पदाधिकारी यांच्यात सप्त संघर्ष सुरू झाला. मोहिते-पाटलांनी माळशिरसमधून उत्तम जानकर, करमाळ्यातून नारायण पाटील तर सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी निश्चित केली आहे.
दरम्यान, सांगोल्यातील अजितदादा गटाचे नेते दीपक साळुंखे यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला. सांगोल्यातून दीपक साळुंखे उमेदवार असतील, असे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले. यामुळे पवार आणि मोहिते- पाटलांचे सांगोल्याचे गणित बिघडले आहे. सेनेचा हा डाव पवार आणि मोहिते-पाटील कसा परतवून लावतात याकडे लक्ष असेल.
मोहोळ मतदारसंघात बंडखोरांचे राज्य
मोहोळ मतदारसंघात पवार गटाकडून ३० जणांनी उमेदवारी मागितली. या मतदारसंघात मोहोळच्या क्षीरसागर कुटुंबातील एकाला उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. काही जण बंडखोरीच्या तयारीत आहेत. ही बंडखोरी अजितदादा गटाच्या पथ्यावर पडण्याची चर्चा आहे. माजी आमदार राजन पाटील आणि पवार गटात काही ठरलंय का? याचीही अनेकांना उत्सुकता आहे.
या मतदारसंघात काँग्रेसकडून कोंडी
पंढरपुरात भगिरथ भालके, अभिजित पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. यादरम्यान, माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा गट उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येते. दुसरीकडे पंढरपूरची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी 'फिल्डिंग' लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे या जागेवरही पवार गटाची अडचण दिसून येत आहे.
माढ्यातून पुन्हा दोन दादांचा संघर्ष
माढ्यातून आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील किंवा शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी मोहिते-पाटील गट प्रयत्नशील आहे. आमदार बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांना भेटून पुत्र रणजितसिंह यांच्या उमेदवारीची मागणी केली होती. परंतु पवारांनी बबनदादांच्या नावाचा आग्रह धरल्याची चर्चा आहे. यादरम्यान, संजय कोकाटे, संजय पाटील घाटणेकर, बाळासाहेब पाटील ही मंडळी स्थानिक नेत्याच्या उमेदवारीचा आग्रह धरीत आहेत. हा तिढा कसा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.