सोलापूर, माढा लोकसभा निवडणूक; मतदान केंद्रावर काय काय असणार मतदारांसाठी सेवासुविधा? जाणून घ्या

By Appasaheb.patil | Published: May 5, 2024 01:30 PM2024-05-05T13:30:56+5:302024-05-05T13:31:40+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: सोलापूर जिल्ह्यात ३ हजार ६१७ मतदान केंद्र असून मतदानासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतची वेळ असणार असून मतदारांसाठी आवश्यक त्या सेवासुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Solapur, Madha Lok Sabha Election; What will be the service facilities for the voters at the polling station? find out | सोलापूर, माढा लोकसभा निवडणूक; मतदान केंद्रावर काय काय असणार मतदारांसाठी सेवासुविधा? जाणून घ्या

सोलापूर, माढा लोकसभा निवडणूक; मतदान केंद्रावर काय काय असणार मतदारांसाठी सेवासुविधा? जाणून घ्या

- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - सोलापूरमाढा लोकसभेसाठी मंगळवार ७ मे रोजी मतदान होणार आहे. आज दोन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची सांगता होणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी प्रशासन वेगाने प्रयत्न करीत आहे. दरम्यान, जिल्ह्यात ३ हजार ६१७ मतदान केंद्र असून मतदानासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतची वेळ असणार असून मतदारांसाठी आवश्यक त्या सेवासुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात वाढत्या उष्णतेमुळे मतदानाचे प्रमाण कमी झाल्याचा अंदाज आल्याने सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी सावलीची व्यवस्था केली जात आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सावलीची सुविधा, पिण्याचे पाणी, प्रत्येक मतदान केंद्रावर ३० ओ. आर. एस. पॉकेट, मतदान रांगेत ठराविक अंतरात खुर्च्या किंवा बेंचची सुविधा, स्वयंसेवक, मोबाईल हेल्थ टीम, प्रथमोपचार किट, हिरकणी कक्ष या उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय व्हील चेअर, रॅम्पची व्यवस्था, मतदान केंद्राची आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता, शौचालयाची स्वच्छता सह अन्य सर्व सोयी सुविधा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तरी सोलापूर शहरातील सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

प्रत्येक मतदान केंद्रावर जेष्ठ मतदारांच्या व दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी व्हील चेअर ची सुविधा देण्यात आली असून त्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवक ही नियुक्त करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मतदान केंद्रावर रॅम्पचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदार मदत कक्ष उघडण्यात येणार आहे, त्या ठिकाणी बी. एल.ओ. ची नियुक्ती केलेली आहे. मतदारांच्या आरोग्यासाठी प्रत्येक मतदार केंद्रावर स्वच्छतागृह स्वच्छ करण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी पाच व पाच पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत अशा ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्राला कलर कोडींग चा वापर केलेला असून मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधणे अत्यंत सुलभ करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी देऊन सर्व मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Solapur, Madha Lok Sabha Election; What will be the service facilities for the voters at the polling station? find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.