"माझे पप्पा मला सोडून गेले" चिमुकलीची आर्त हाक; अमित ठाकरेही गहिवरले, काळीज पिळवटणारा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 19:41 IST2026-01-04T19:39:53+5:302026-01-04T19:41:02+5:30
अमित ठाकरे यांनी सोलापूरात बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाला भेट देत सांत्वन केले. मात्र याठिकाणी बाळासाहेब यांच्या लहान चिमुकल्यांचा आक्रोश पाहून अमित ठाकरेही गहिवरले.

"माझे पप्पा मला सोडून गेले" चिमुकलीची आर्त हाक; अमित ठाकरेही गहिवरले, काळीज पिळवटणारा Video
सोलापूर - राज्यातील महापालिका निवडणुकीत अत्यंत लज्जास्पद आणि संतापजनक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. याठिकाणी लहान मुलांवरील वडिलांचं छत्र राजकारणामुळे कायमचं हिरावून घेतले आहे. अर्ज माघारी घेण्याच्या वादातून सोलापूरात मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे सोलापूर शहरात खळबळ माजली. या सरवदे कुटुंबाची आज मनसे नेते अमित ठाकरे यांनी भेट घेतली.
अमित ठाकरे यांनी सोलापूरात बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाला भेट देत सांत्वन केले. मात्र याठिकाणी बाळासाहेब यांच्या लहान चिमुकल्यांचा आक्रोश पाहून अमित ठाकरेही गहिवरले. बाळासाहेब सरवदे यांची लहान मुलगी ढसाढसा रडत होती. माझे पप्पा मला सोडून गेले असं म्हणत ती आर्त हाक देत होती. हे दृश्य पाहून कुणाचेही मन हेलावेल. अमित ठाकरे यांच्यासमोर हात जोडून ही चिमुकली वडिलांच्या आठवणीने अक्षरश: कोलमडून पडली. अमित ठाकरे तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होते मात्र या क्षणांनी तेदेखील निःशब्द झाले. या घटनेचा व्हिडिओ तिथे काहीजण कॅमेऱ्यात कैद करत होते. मात्र ही बाब अमित ठाकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ सर्व रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तींना घराच्या बाहेर पाठवले. परंतु आता यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून कुणाचेही डोळे पाणावतील.
अमित ठाकरे संतापले
बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाची सांत्वन भेट घेतल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी संतप्त भूमिका मांडली. राजकारणाची पातळी इतक्या खालच्या थराला गेली आहे. पैशाचे आमिष दाखवून अर्ज मागे घेण्यापर्यंत ठीक होते परंतु आता लोकांचा खून करेपर्यंत मजल गेली, ते फक्त निवडणुकांसाठी..मी इथे आलोय तसं देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी येथे येऊन इथली परिस्थिती काय आहे ते पाहिले पाहिजे. अशा निवडणुका असतील तर आम्हाला निवडणुका नको, आम्ही सगळे अर्ज परत घेतो. तुम्ही जिंका. ती मुलगी रडत होती. अशी परिस्थिती महाराष्ट्रातली तुम्ही आणून ठेवली असं त्यांनी म्हटलं.
तसेच कुणाच्या मृत्यूचं राजकारण करायला मी इथे आलो नाही. पण आपलं राज्य तुम्ही कुठे नेऊन ठेवलंय हे तुम्हाला कळणार आहे की नाही. आपल्या सगळ्यातील एक माणूस जागा झाला पाहिजे आणि या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे तुम्ही एक दिवस प्रचार सोडा आणि इथे या. या निवडणुका कुठल्या पातळीवर नेऊन ठेवल्यात हे तुम्हाला कळेल. एक आई, बायको आणि २ मुली आज अस्थी विसर्जन करून आल्यात. कशासाठी निवडणुकीसाठी...याची उत्तरे मला मिळालीच पाहिजे. बाळासाहेबांना न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.