Grass in the granite! Solapur! | माढ्यात घासून.. सोलापुरात ठासून !
माढ्यात घासून.. सोलापुरात ठासून !

ठळक मुद्देमतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या दोन तासातच सोलापूरचा कौल लक्षात आला.माढ्यासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत रस्सीखेच सुरू होती. शिंदे आणि निंबाळकर यांच्यातील मताधिक्य कमी-जास्त होत होते

राकेश कदम 

सोलापूर : मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या दोन तासातच सोलापूरचा कौल लक्षात आला. माढ्यासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत रस्सीखेच सुरू होती. शिंदे आणि निंबाळकर यांच्यातील मताधिक्य कमी-जास्त होत होते. दुपारनंतर मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना निकालाचा अंदाज येऊ लागला.  

पहिल्या फेरीनंतर...
पहिल्या फेरीत भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांना २३ हजार ३९९ मते मिळाली तर सुशीलकुमार शिंदे यांना १८ हजार २४० मते मिळाली. प्रकाश आंबेडकर यांना ६ हजार ३३८ मते मिळाली. माढ्यातून संजय शिंदे यांना २० हजार ९८६ तर रणजितसिंह निंबाळकर यांना २१ हजार १६२ मते मिळाली. दोन्ही मतदारसंघाची अधिकृत आकडेवारी लवकर बाहेर आली नव्हती. संजय शिंदे यांनाच मताधिक्य मिळाल्याचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

दुसºया फेरीनंतर...
या फेरीत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना २१ हजार ५४३ मते मिळाली तर डॉ. जयसिध्देश्वर महाराज यांना १९ हजार ५७६ मते मिळाली. मात्र मागील फेरीत महाराजांना मिळालेले मताधिक्य जास्त असल्याने महाराज आघाडीवर राहिले. 

संजय शिंदे यांना २० हजार ५५३ तर निंबाळकर यांना २१ हजार ९३१ मते मिळाली. पहिल्या दोन फेरीत निंबाळकर यांनी एक हजार १४ मतांची आघाडी घेतली. आता मात्र अधिकृत आकडेवारी बाहेर येउ लागल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर मतमोजणीचे अपडेट मिळत राहिले. 

पाचव्या फेरीनंतर...
पाचव्या फेरीत डॉ. जयसिध्देश्वर महाराज यांना १ लाख २४ हजार ७२ मते मिळाली होती तर सुशीलकुमार शिंदे यांना ८८ हजार ४८६ मते मिळाली होती. प्रकाश आंबेडकर यांना ३० हजार ८३३ मते मिळाली होती. यादरम्यान भाजपचे मनपातील सभागृह नेते संजय कोळी, श्रीशैल बनशेट्टी आणि इतर नगरसेवकांनी माध्यम कक्षात येउन शहरातील मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्याविषयी माहिती दिली. आमचा उमेदवार किमान एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होईल, असा दावा केला. भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनीही शहर दक्षिण, अक्कलकोट या भागात झालेल्या मतदानाविषयी माहिती दिली. काँग्रेसच्या गोटात मात्र शांतता पाहायला मिळाली. 

दहाव्या फेरीनंतर...
या फेरीत डॉ. जयसिध्देश्वर महाराज यांना दोन लाख ३८ हजार ४२२ मते मिळाली होती तर सुशीलकुमार शिंदे यांना एक लाख ६३ हजार ३०४ मते मिळाली. महाराजांना ७५ हजारहून अधिकचे मताधिक्य मिळाले होते. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांना ६५ हजार ३३३ मते मिळाली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या गोटात शांतता दिसून आली. अनेक मतमोजणी केंद्रावरील कार्यकर्ते हळूहळू काढता पाय घेत होते. एव्हाना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही निकाल लक्षात आला होता. त्यामुळे त्यांचेही बरेच कार्यकर्ते बाहेर जात असल्याचे पाहायला मिळाले. 

माढ्यातून रणजितसिंह निंंबाळकर यांना दोन लाख ३१ हजार तर संजय शिंदे यांना दोन लाख १३ हजार ८३८ मते मिळाली. दोघांमधील मताचे अंतर १७ हजार होते. माळशिरस, माण, फलटण तालुक्यातून निंबाळकर यांना मिळणारे मताधिक्य वाढत होते. दुसरीकडे  करमाळा, माढा आणि सांगोला तालुक्यातून संजय शिंदे यांना मिळणारे मताधिक्य माळशिरस आणि माणच्या तुलनेत कमी असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांच्यास कार्यकर्त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातारण दिसू लागले होते. दुसरीकडे भाजपचे धैर्यशील मोहिते-पाटील आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत चालला होता.  

अन् जल्लोष सुरू
पंधराव्या फेरीनंतर डॉ. जयसिध्देश्वर महाराज यांचे मताधिक्य एक लाखाहून अधिक झाले होते तर रणजितसिंह निंबाळकर यांचे मताधिक्य ४० हजारापेक्षा जास्त झाले होते. त्यामुळे सोलापुरातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते रामवाडी गोदामातून बाहेर पडून शहरात जल्लोष करण्यासाठी निघाले. काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज होउ निघून गेले. 


Web Title: Grass in the granite! Solapur!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.