Due to the gathering of the nurse-black group, the lotus lotus | परिचारक-काळे गटाच्या एकत्रीकरणामुळे फुलले कमळ
परिचारक-काळे गटाच्या एकत्रीकरणामुळे फुलले कमळ

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर तालुक्यात आजवर विळ्या-भोपळ्याचे सख्य असणारे परिचारक-काळे गटाचे कार्यकर्ते एकदिलाने काम करताना दिसले. भविष्यात हे दोन्ही गट एकदिलाने काम करीत राहिल्यास विधानसभेच्या निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणे सोयीस्कर होणार आहे

प्रभू पुजारी

पंढरपूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा विजय झाल्याने तालुक्याच्या राजकारणाची समीकरणे वेगाने बदलणार आहेत़ राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भविष्यातही कमळ फुलण्याची शक्यता या निवडणुकीने मजबूत झाली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील माढा विधानसभा मतदारसंघातील ४२ तर सांगोला विधानसभा मतदारसंघातील १५ गावांचा समावेश आहे़ दोन्ही मतदारसंघांतील प्रत्येक गावात यापूर्वी पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक गटाचे प्राबल्य राहिले आहे़ यामध्ये परिचारक गट, काळे गट व भालके गटाचे कार्यकर्ते कधी स्वतंत्र तर कधी आघाडी करून स्थानिक निवडणुकांमध्ये लढले आहेत़ गत पाच वर्षांत आ़ बबनराव शिंदे यांनी ४२ गावांत स्वतंत्र गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी स्थानिक कार्यकर्त्यांनी मात्र स्थानिक नेतृत्वावरच विश्वास ठेवल्याचे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे़ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांचाही भाजपच्या विजयाला हातभार लागला आहे.

कल्याणराव काळे यांच्या भाजप प्रवेशाने बळकटी आली़ राष्ट्रवादीच्या मोजक्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी व भालके गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेले परिश्रम संजय शिंदे यांचे मताधिक्य वाढविण्यावर परिणामकारक ठरू शकले नाही.

निवडणुकीच्या काळात विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुढे केलेला कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प भाजपच्या पथ्यावर पडला़ माढा व सांगोला विधानसभा मतदारसंघातील नदीकाठच्या गावांना पाणी मिळविण्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून बबनराव शिंदे यांची निष्क्रियता या निवडणुकीत राष्ट्रवादीला नडल्याचे निकालावरून सिद्ध झाले आहे.

पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गासाठी खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केलेले प्रयत्न, खासदार निधीतून त्यांनी गेल्या पाच वर्षांत तालुक्यातील कार्यकर्त्यांशी ठेवलेला संपर्क तसेच आ़ प्रशांत परिचारक व कल्याणराव काळे यांनी एकत्रित  येऊन गावोगावी केलेले प्रचार दौरे, त्यांना स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मतभेद मिटविण्यासाठी आलेले यश तसेच माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी ही निवडणूक अंगावर घेऊन गावोगावी जाऊन केलेला प्रचार  हीदेखील निंबाळकर यांच्या विजयाची कारणे ठरली आहेत़

परिचारक-काळे गट सक्रिय
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर तालुक्यात आजवर विळ्या-भोपळ्याचे सख्य असणारे परिचारक-काळे गटाचे कार्यकर्ते एकदिलाने काम करताना दिसले.  भविष्यात हे दोन्ही गट एकदिलाने काम करीत राहिल्यास विधानसभेच्या निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणे सोयीस्कर होणार आहे़ संजय शिंदे यांना झेडपीचे अध्यक्ष करण्यामध्ये आ़ प्रशांत परिचारक यांचा सिंहाचा वाटा होता; परंतु संजय शिंदे यांनी ऐनवेळी आ़ प्रशांत परिचारक यांच्या मित्रत्वाला तडा दिला़ त्यामुळे आ़ प्रशांत परिचारक यांनी मित्रत्वापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला अधिक महत्त्व दिले अन् सक्रिय होऊन प्रचार केल्यानेच निंबाळकर यांचा विजय सोपा झाल्याचे निकालावरून दिसून येते़ 


Web Title: Due to the gathering of the nurse-black group, the lotus lotus
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.