माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयाची गणिते जुळता जुळेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 10:56 AM2019-04-25T10:56:26+5:302019-04-25T10:59:27+5:30

नेत्यांचे आदेश स्थानिक कार्यकर्त्यांनी डावलले; प्रत्यक्षात मतमोजणीनंतर कोणाचा दावा खरा ठरणार हे स्पष्ट होईल

Candidates of Madha Lok Sabha constituency can not match the success of the candidates | माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयाची गणिते जुळता जुळेना 

माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयाची गणिते जुळता जुळेना 

googlenewsNext
ठळक मुद्देबहुचर्चित माढा मतदारसंघात लोकसभेसाठी चुरशीने ६३ टक्के मतदान झालेपंढरपूर तालुक्यातील समाविष्ट असलेल्या ५७ गावांमध्ये उत्स्फूर्तपणे ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदानवाढलेल्या टक्क्यांवर राष्ट्रवादी व भाजपने आपला दावा सांगितला

मोहन डावरे

पंढरपूर : बहुचर्चित माढा मतदारसंघात लोकसभेसाठी चुरशीने ६३ टक्के मतदान झाले असले तरी यामध्ये पंढरपूर तालुक्यातील समाविष्ट असलेल्या ५७ गावांमध्ये उत्स्फूर्तपणे ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे़ या वाढलेल्या टक्क्यांवर राष्ट्रवादी व भाजपने आपला दावा सांगितला आहे.

मात्र मतदानापूर्वी घडलेल्या वेगवान घडामोडींमुळे काही प्रमाणात राष्ट्रवादी मागे पडेल, असे चित्र असताना प्रत्यक्ष मतदानावेळी मात्र नेत्यांचे आदेश डावलत राष्ट्रवादीलाच मतदारांनी भरभरून कौल दिल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे़ प्रत्यक्षात निकाल महिनाभरानंतर लागणार असला तरी विजयासाठी दावे, प्रतिदावे, पैज यामुळे मतदारसंघात खमंग चर्चा सुरू आहे.

माढा लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो़ मात्र यावेळी शरद पवार यांच्या नाट्यमय माघारीनंतर भाजपने आपली संपूर्ण ताकद लावत माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, फलटण, माण, खटाव व पंढरपूर या तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीसाठी फायद्याचे ठरणारे मातब्बर नेते, साखर कारखानदार यांनाच आपल्या पक्षात प्रवेश देऊन राष्ट्रवादीसमोर तगडे आव्हान उभे केले़ त्यामुळे राज्यभर राष्ट्रवादीचा हा गड ढासळणार अशी चर्चा सुरू झाली़ शेवटपर्यंत पंतप्रधान, मुख्यमंत्री व राज्याच्या अर्ध्या मंत्रिमंडळाने माढा मतदारसंघात महत्त्वाच्या ठिकाणी सभा घेऊन भाजपच जिंकणार असे चित्र उभे करण्यात यश मिळविले होते.

राष्ट्रवादीनेही सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या या हल्ल्याला शिस्तबद्ध उत्तरे देत रामराजे निंबाळकर, अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप सोपल यांनी किल्ला लढवत ठेवला.

शेवटपर्यंत भाजपची हवा असणाºया या मतदारसंघात प्रचार संपल्यानंतर मात्र अनेक नेत्यांनी आपापल्या समर्थकांना दिलेले आदेश डावलत कार्यकर्त्यांनी विरोधात कौल दिल्याचे बोलले जात होते.

माढा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यात रोपळे, भाळवणी, भोसे व करकंब या चार झेडपी गटांचा समावेश आहे़ यामध्ये तालुकास्तरीय नेतृत्वाची बेरीज केल्यास भाजपचेच प्राबल्य दिसून येते.

मात्र प्रत्यक्षात करकंब गटातील करकंब गाव, रोपळे गटातील सुस्ते, तुंगतचा परिसर वगळला व भाळवणी गटातील फक्त भाळवणी हे एकमेव मोठे गाव सोडले तर इतर चारही झेडपी गटात घड्याळालाच कौल दिल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती़

एकत्र नेते अन् मोकळे कार्यकर्ते
- काही गावांमध्ये भाजपनेही तालुकास्तरावरील एकत्र आलेल्या नेत्यांचा फायदा उठवत मताधिक्य घेण्याचा दावा केला आहे, तर अनेक गावांमध्ये निम्मी मते आम्हीच घेऊन, या ५७ गावांमध्ये सर्वाधिक मताधिक्य भाजपलाच मिळेल, असा दावा केला जात होता़ त्यामुळे प्रत्यक्षात मतमोजणीनंतर कोणाचा दावा खरा ठरणार हे स्पष्ट होईल़ नेते एकत्र आले असले तरी कार्यकर्ते मात्र मोकळेच असल्याचे चित्र होते.

Web Title: Candidates of Madha Lok Sabha constituency can not match the success of the candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.