Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 18:52 IST2026-01-02T18:51:36+5:302026-01-02T18:52:22+5:30
Solapur BJP News: महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच सोलापूर भाजपच्या दोन गटांत मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच सोलापूर भाजपच्या दोन गटांत मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी पेठ भागातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये उमेदवारी न मिळाल्याच्या रागातून भाजपच्याच एका गटाने माजी नगरसेवक शंकर शिंदे यांचे संपर्क कार्यालय फोडल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकारामुळे जोशी गल्ली परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
नेमका वाद काय?
सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजपचे दोन प्रभावी गट आहेत - शिंदे गट आणि सर्वदे गट. या प्रभागातून उमेदवारी मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी जोरदार ताकद लावली होती. मात्र, भाजपने शिंदे गटातील शालन शिंदे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. यामुळे सर्वदे गट प्रचंड आक्रमक झाला. उमेदवारी नाकारल्या गेल्याच्या रागातून सर्वदे गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक शंकर शिंदे यांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
तोडफोडीची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी परिसरात तणाव कायम आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शंकर शिंदे यांच्या कार्यालयाबाहेर दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि परिसरात पोलिसांचे गस्ती पथक वाढवण्यात आले आहे.
भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
भाजपमध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर बंडखोर असतील किंवा इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये मोठी नाराजी आहे आणि त्याच नाराजीतून सोलापुरात हा प्रकार घडल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून भाजपमधील अंतर्गत वाद याठिकाणी पाहायला मिळाला आहे.