गणपत आबांचा राजकीय 'वारसदार' ठरला, सांगोल्यात शेकापकडून उमेदवार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 15:14 IST2019-09-29T15:12:43+5:302019-09-29T15:14:34+5:30
विधानसभा निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो तर आमदार म्हणून निश्चित निवडून येईन पण माझ्या माघारी शेकापचे भवितव्य काय?

गणपत आबांचा राजकीय 'वारसदार' ठरला, सांगोल्यात शेकापकडून उमेदवार जाहीर
सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती सांगोला येथे रविवारी झालेल्या बैठकीत आ. गणपतराव देशमुख यांचे राजकीय वारसदार म्हणून भाऊसाहेब रुपनर यांची उमेदवारी सांगोला विधानसभा मतदारसंघातून जाहीर करण्यात आली. रुपनर हे फॅबटेक उद्योगसमूहाचे प्रमुख आहेत. यांच्या नावाची घोषणा होताच शेकापचे अनेक कार्यकर्ते बैठकीच्या ठिकाणाहून निघून गेले.
आ. गणपतराव देशमुख यांनी पुन्हा निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. गेल्या काही दिवसांपासून आ. देशमुख यांनी याबाबत कार्यकर्त्यांची समजूत काढत आपण नवीन कार्यकर्त्याला संधी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार भाऊसाहेब रुपनर, अॅड. सचिन देशमुख, माजी सभापती बाळासाहेब काटकर, चंद्रकांत देशमुख व बाबा कारंडे या पाच नावांची चर्चा सुरू होती. यामध्ये भाऊसाहेब रुपनर यांचे नाव रविवारी निश्चित करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो तर आमदार म्हणून निश्चित निवडून येईन पण माझ्या माघारी शेकापचे भवितव्य काय? भविष्यात शेकापचे तत्त्वज्ञान तालुक्यात टिकले पाहिजे. यासाठी मी ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याकडे पाच नावे आली आहेत मी व शेकापचे सर्व पदाधिकारी यावर निर्णय लवकरच घेणार आहोत. या निवडणुकीत मी उमेदवार नसलो तरी जो उमेदवार आपण देणार आहोत त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यादृष्टीने आजपासून कामाला लागावे, असे प्रतिपादन आमदार गणपतराव देशमुख यांनी यापूर्वी घेतलेल्या मेळाव्यात केले होते. त्या मंथन मेळाव्यात शेकापचे कार्यकर्ते प्रंचड आक्रमक झाले होते , आ.गणपतराव देशमुखांनीच निवडणूक लढविली पाहिजे, कार्यकर्त्याच्या भावनेचाही विचार केला पाहिजे यासाठी अनेकजन व्यासपीठावर येवून आबाच्या पाया पडून रडू लागल्याचे दिसत होते.व्यासपीठासमोर कार्यकर्ते प्रंचड आक्रमक भूमिका घेतली होती. "कहो दिलसे आबा फिरसे" अशी घोषणाबाजी सुरू होती.