ढाळा ओ... बळीराजानं करुन दाखवलं, केवळ पावसाच्या पाण्यावर ३१० क्विंटल हरभरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 15:16 IST2022-02-15T15:15:16+5:302022-02-15T15:16:10+5:30
सोलापूर/ अक्कलकोट : कोण म्हणतं शेतीत काही राम नाही.. केल्यानं होत आहे रे आधी केलेचि पाहिजे या उक्तीनुसार नागणसूरच्या ...

ढाळा ओ... बळीराजानं करुन दाखवलं, केवळ पावसाच्या पाण्यावर ३१० क्विंटल हरभरा
सोलापूर/अक्कलकोट : कोण म्हणतं शेतीत काही राम नाही.. केल्यानं होत आहे रे आधी केलेचि पाहिजे या उक्तीनुसार नागणसूरच्या सेवानिवृत्त शेतकऱ्यानं आपल्या तीस एकर जिराईत शेतात चक्क ३१० क्विंटल हरभरा पिकाचं उत्पन्न घेऊन आपली प्रगती साधली आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर एवढे उत्पन्न मिळवण्याची ही अक्कलकोट तालुक्यातील पहिली घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. नागणसूर (ता. अक्कलकोट) येथील बसवराज सिद्रामप्पा कोनापुरे या सेवानिवृत्त शिक्षकाची ३० एकर जिरायत शेती आहे. पाण्याचं स्रोत नसले, तरी त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने शेती केली. यामुळे त्यांच्या तीन पिढ्यांमध्ये झालं नाही एवढं ३१० क्विंटल हरभरा पिकाचं उत्पन्न घेतलं. तालुक्यात रेकॉर्ड त्यांनी मोडलं आहे.
नागणसूर येथे कोनापुरे यांची पिढीजात शेती आहे. दरवर्षी याच क्षेत्रामध्ये कधी तूर, तर कधी हरभरा असे आलटून पालटून पिके घेतात. आतापर्यंत याच क्षेत्रात सर्वाधिक २५० क्विंटल उत्पादन निघाले आहे. यंदा सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांची अनेक पिके हातून गेली आहेत. कोनापूरे यांनी कर्नाटक राज्यातून ‘अणेगिरी’ या जातीचे ११ क्विंटल बियाणे आणले होते. यातून तब्बल ३१० क्विंटल विक्रमी उत्पादन मिळाले. सध्याचा बाजारभाव प्रतिक्विंटल ५ हजार रुपये आहे. त्यानुसार तब्बल १५ ते १६ लाख रुपये होतील. तालुक्यात नेहमीच नागणसूर शिवारात दरवर्षी हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक असते.
यामुळे मिळालं विक्रमी उत्पादन
तीस एकर जिराईत क्षेत्रामध्ये कर्नाटक राज्यातून ‘आणेगिरी’ नावाचे ११ क्विंटल बियाणे आणले. पारंपरिक पद्धतीने पेरणी केली. १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाच वेळा कीटकनाशके व टॉनिक औषध फवारले. एकरी एक पोते डीएपी रासायनिक खताची मात्रा दिली. एक वेळा खुरपणी केली, एक वेळा कुळव मारला अशा शंभर दिवसांच्या कालावधीत नियमितपणे व्यवस्थापन करण्यात आले आहे. यामुळे विक्रमी उत्पादन मिळाले.
पूर्वजापासून आमची शेती आहे. या क्षेत्रात आतापर्यंत सर्वाधिक २५० क्विंटल उत्पादन निघालेले होते. यंदा वातावरण खराब असतानाही मला बंपर उत्पन मिळाले. ३० एकर जमिनीत तब्बल ३१० क्विंटल हरभरा निघाला. आतापर्यंत जिराईत क्षेत्रात एकरी पाच क्विंटल उच्चांकी उत्पादन मिळालेले आहे. मला १० क्विंटल उत्पन्न मिळाले. हरभरा सध्या वेअरहाऊस मध्ये ठेवला आहे. भाववाढ होताच विक्री करू.
- बसवराज कोनापुरे, शेतकरी