Video: टोनी स्टार्क भाजप, तर हल्कला शिवसेनेकडून उमेदवारी; महाराष्ट्राच्या राजकारणात हॉलिवूडचे सुपरहिरो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:55 IST2026-01-07T17:53:59+5:302026-01-07T17:55:30+5:30
हे AI द्वारे बनवलेले व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Video: टोनी स्टार्क भाजप, तर हल्कला शिवसेनेकडून उमेदवारी; महाराष्ट्राच्या राजकारणात हॉलिवूडचे सुपरहिरो
Maharashtra Municipal Election 2026 : महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विविध पक्षांचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावर प्रचारासंबंधी विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. अशाच काही व्हिडिओमध्ये हॉलिवूडच्या 'अॅव्हेंजर' सिनेमातील टोनी स्टार्क आणि हल्क भाजप आणि शिवसेना पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत. AI ने तयार केलेल्या व्हिडिओमध्ये या दोन्ही सुपरहिरोंचे एक वेगळे, हटके आणि पूर्णपणे राजकीय रूप पाहायला मिळत आहे.
टोनी स्टार्कची भाजपात एंट्री
सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये टोनी स्टार्क एका मोठ्या सभेत भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना दिसतो. AI द्वारे तयार करण्यात आलेल्या या व्हिडिओत टोनी स्टार्क म्हणतो, काल रात्री हल्कने दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यामुळे मी भाजपाकडून निवडणूक लढवत आहे.
व्हिडिओत टोनी हल्कवर थेट आरोप करत म्हणतो की, मुंबई नष्ट करणे, हे हल्कचे एकच लक्ष्य आहे. माझे मात्र एकच वचन आहे, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला पुढे नेणे. यानंतर ‘भारत माता की जय’ आणि ‘अबकी बार थानोस की हार’ अशा घोषणांचा गजर होताना दिसतो.
हल्कने शिवसेनेतून भरला उमेदवारी अर्ज
दुसऱ्या व्हायरल व्हिडिओत हल्क शिवसेनाच्या व्यासपीठावर उभा राहून मुंबईच्या विकासाबाबत भाष्य करताना दिसतो. या AI व्हिडिओत मुंबई महापालिका (BMC) निवडणुकांचा संदर्भ देत हल्क विरोधी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो. हल्क म्हणतो की, मुंबईचा विकास हाच माझा अजेंडा आहे, शेवटी ‘जय हिंद’, ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा देतो.
सोशल मीडियावर युजर्सच्या मजेशीर प्रतिक्रिया
हे दोन्ही व्हिडिओ shivsenahulk आणि bjptonystark या इन्स्टाग्राम अकाउंट्सवरून शेअर करण्यात आले असून, आतापर्यंत लाखो लोकांनी हे व्हिडिओ पाहिले आहेत. हजारो लाइक्स आणि कमेंट्समुळे सोशल मीडिया अक्षरशः भरून गेला आहे. युजर्सनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, या वेळेस टोनी स्टार्कच जिंकणार! तर, दुसऱ्याने टोनीवर थेट ‘वोट चोरी’चा आरोप केला. आणखी एका युजरने हल्कचे नावच बदलून “हल्कनाथ” ठेवले.