सुट्ट्या संपल्या; पाऊले चालती परतीची वाट; सर्वच रेल्वे स्थानकांवर मुंबईकरांची तुफान गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 16:56 IST2025-09-02T16:56:01+5:302025-09-02T16:56:35+5:30
आता परतीसाठीही हाउसफुल्ल गर्दी

सुट्ट्या संपल्या; पाऊले चालती परतीची वाट; सर्वच रेल्वे स्थानकांवर मुंबईकरांची तुफान गर्दी
कणकवली : गणेशोत्सवासाठी गावी दाखल झालेले मुंबईकर दीड, पाच दिवसांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करून मुंबईला परतीच्या प्रवासाला लागले आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही हजारोंच्या संख्येने मुंबईकर गणेशभक्त गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी दाखल झाले आहेत. गणेशोत्सव साजरा करून ते मुंबईला परतू लागले आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसत आहे. मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या तुडुंब भरून धावू लागल्या आहेत.
मुंबईकराना परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वेसह एसटी प्रशासनाकडून ज्यादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशभक्तांची चांगली सोय झाली, तर दुसरीकडे सुट्ट्यांचे नियोजन करून, अजूनही मुंबईकर गावी दाखल होत आहेत.
उत्साह शिगेला
सिंधुदुर्गासह तळकोकणात गणेशोत्सवाचा माहोल सुरू असून, उत्साह शिगेला पोहोचला आहे. या गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे व अन्य भागात नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले कोकणवासीय आपल्या मूळ गावी दाखल झाले आहेत. लाखोंच्या संख्येने गणेशभक्त जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
प्रसंगी जनरल बोगीतून प्रवास करून गावी
गावी येताना काही ज्यादा गाड्या सोडण्यात आल्याने मोठ्या संख्येने रेल्वे गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून धावत होत्या. परिणामी, अनेक गाड्या उशिराने धावत होत्या. त्यातच कन्फर्म तिकिटे न मिळालेल्या मुंबईकरांनी जनरल बोगीतून प्रवास करण्यासाठी एक एक दिवस अगोदर दादर, ठाणे आदी रेल्वे स्थानकांत रांगा लावल्या होत्या. त्यानंतर, अनेक तासांचा प्रवास करून मुंबईकर गावी दाखल झाले होते. आता गर्दी गाड्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
आता दुसऱ्या टप्प्यातील मुंबईकरांचे आगमन
टप्प्याटप्प्याने मुंबईकर परतत आहेत. खासगी वाहने घेऊन आलेले मुंबईकर परतीच्या प्रवासाला लागल्याने, महामार्गावरही गाड्यांची मोठी वर्दळ दिसून येत आहे. खासगी आराम बसेसचे बुकिंगही फुल्ल झाले असून, तिकिटांचे दरही वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अकरा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करून काही जण परतणार आहेत, तर पहिल्या पाच दिवसांत सुट्टी न मिळालेले मुंबईकर अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सवासाठी येत राहणार आहेत.
आता परतीसाठीही हाउसफुल्ल गर्दी
पाच दिवसांच्या गणरायांना निरोप देऊन ते परतीच्या प्रवासाला लागले आहेत. यामुळे कुडाळ, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, कणकवली आदी प्रमुख रेल्वे स्थानकांवर मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी दिसत आहे. सर्वच गाड्यांचे तिकीट आरक्षण आधीच फुल्ल झाले आहे. जनरल बोगीतही हाउसफुल्ल गर्दी होत आहे.