सावंतवाडीत महाविकास आघाडीत बिघाडी, अर्चना घारे-परब यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
By अनंत खं.जाधव | Updated: October 25, 2024 16:15 IST2024-10-25T16:12:36+5:302024-10-25T16:15:37+5:30
वरिष्ठ नेते अनुपस्थित

सावंतवाडीत महाविकास आघाडीत बिघाडी, अर्चना घारे-परब यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी थेट बंडाचा झेंडा हाती घेत शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडीकडून राजन तेलींना उमेदवारी जाहिर झाल्याने शरदचंद्र पवार गटाच्या नाराज कार्यकर्त्यांनी एकमुखी निर्णय घेत अर्चना घारे परब यांना समर्थन दर्शविले. बैठकीत पार्सेकर यांनी जर तुम्हाला खऱ्या अर्थाने विकास हवा रोजगार हवा तर आता तुम्हीच ओळखा कुणाला पाठींबा द्याचा ते असे म्हणत घारे-परब यांचे कौतुक केले.
घारे-परब यांनी भावनाविवश होत आपण गेली आठ वर्षे काम करत होते. पण पाच वर्षापूर्वी संधी हुकली मात्र आता महाविकास आघाडीत उमेदवारी दुसऱ्या पक्षाला दिली गेली. पण आता कार्यकर्ते पाठींबा देत असाल तर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असे म्हणताच उपस्थितांनी घारे-परब यांना हात उंचावून पाठींबा दिला. त्यानंतर जोरदार शक्तिप्रदर्शन करत येथील वैश्य भवन ते प्रांताधिकारी कार्यालय पर्यत रॅली काढत आपले नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांच्याकडे दाखल करण्यात आला. यावेळी घारे-परब यांनी एक अर्ज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून तर दुसरा अर्ज अपक्ष म्हणून असे दोन अर्ज दाखल करण्यात आले.
वरिष्ठ नेते अनुपस्थित
अर्चना घारे-परब यांनी मेळावा घेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला पण या वेळी शरदचंद्र पवार गटाचे वरिष्ठ नेते मात्र अनुपस्थित होते. पण स्थानिक नेत्यांनी उपस्थिती दर्शवीत आपला पाठींबा जाहीर केला.